हक्काच्या घरासाठी छोटा रूद्र आणि त्याच्या नातेवाइकांचे उपोषण

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत गमावले होते आई-वडील !

चिपळूण – तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत २२ जणांचा बळी गेला होता. या घटनेत स्वत:चे आई-वडील आणि बहीण गमावलेला ७ वर्षीय रूद्र चव्हाण याला अद्याप घर मिळालेले नाही. त्याला घर मिळावे, यासाठी त्याच्यासह त्याच्या नातेवाइकांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण चालू केल्याचे वृत्त लोकमत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

रूद्रच्या पालकत्वाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने, तसेच घराची सोडत काढतांना त्यांच्या नातेवाइकांनी रुद्रसाठी घराची मागणी केली नसल्याचे प्रांताधिकार्‍यांनी सांगितले.

२ जुलै २०१९ या दिवशी तालुक्यातील तिवरे येथे अतीवृष्टीमुळे धरण फुटले होते. या दुर्घटने रूद्र चव्हाण याचे वडील रणजित, आई ऋतुजा, तसेच बहीण दुर्वा यांचा मृत्यू झाला होता. या वेळी रूद्र तालुक्यातील पेठमाप येथे त्याच्या आत्याकडे वास्तव्यास असल्यामुळे वाचला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना शासकीय साहाय्य मिळाले; मात्र या साहाय्य वाटपाच्या वेळी रूद्रच्या पालकत्वाचा वाद चालू झाला. रूद्रचे चुलते आणि आत्या यांनी पालकत्वासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर निर्णय अद्याप झालेला नाही.

पुनर्वसन अंतर्गत अलोरे येथील घरांच्या सोडतीत रूद्रला घर मिळाले नाही. अशातच सोडत लागलेल्यापैकी सीताराम महादेव रामाणे यांनी तिवरे गावी पुनर्वसन करण्याची मागणी केल्याने घर नं. २१ रिकामे होते. हे घर रूद्रला देण्यात यावे, असा आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला होता.

संपादकीय भूमिका

हक्काच्या घरासाठी छोट्या मुलाला उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !