लडाखमध्ये बसवण्यात आले जगातील पहिले ‘लाय फाय’ नेटवर्क !
आता डोंगराळ भागांतही मिळणार गतीमान इंटरनेट
लेह (लडाख) – लडाख येथील डोंगराळ क्षेत्रात संपर्कासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ‘लाय फाय’ असे याचे नाव आहे. याची यशस्वी चाचणी करण्यात आली. ‘लाय फाय’, म्हणजेच ‘लाईफ फिडॅलिटी टेक्नोलॉजी’ असे याचे नाव आहे. याद्वारे पर्वतीय भागांमध्ये ‘५ जी’ नेटवर्क पोचवण्यास साहाय्य होणार आहे. संपूर्ण जगातील या तंत्रज्ञानाचा वापर प्रथम येथेच करण्यात आला आहे.
सौजन्य सोनम वांगचूक
डोंगराळ भागांत इंटरनेटच्या नेटवर्कसाठी अनेक अडथळे येत असतात. येथे वायरचा वापर करता येत नाही, तसेच विजेची समस्याही असते. या पार्श्वभूमीवर लाय फाय तंत्रज्ञानाचा येथे वापर करता येणे शक्य होणार आहे. लडाख येथे लाय फायची चाचणी करून हे तंत्रज्ञान येथे बसवण्यात आले आहे. या तंत्रज्ञानासाठी कर्णावती येथील आस्थापनाने साहाय्य केले आहे. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा गती अधिक मिळण्यासह पर्यावरणालाही हानी होत नाही, तसेच याचा खर्च ही अल्प आहे.