समलिंगी विवाह हा अनैसर्गिक आचार आणि विकृतीच !
निसर्गनियम चराचरसृष्टीला विकासासाठी साहाय्य करतात. जीवमात्रांचे जीवन सुलभ आणि सुखी होण्यासाठी निसर्गनियमांचे पालन करणे हिताचे आहे. निसर्गनियमांचा अभ्यास करून माणसाने स्वतःचे जीवन सुखी आणि आनंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. निसर्गनियमांचा अभ्यास करून निसर्गातील अनेक रहस्य उलगडण्याचा प्रयत्न जे शास्त्र करते, तेच विज्ञान होय. आज विज्ञानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या विज्ञानाच्या आधारे माणसाने आपल्या स्वतःच्या अक्कल हुशारीने निसर्गनियमांना डावलून विविध प्रकारचे प्रयोग केले. नैसर्गिक जीवन जगण्याऐवजी कृत्रिम जीवन जगण्याकडे माणसाचा कल वाढत गेला. अधिक सुखी होण्यासाठी अधिक भौतिक वस्तूंची आवश्यकता माणसाला वाटू लागली. ‘जेवढी भौतिक साधने अधिक तेवढे सुख अधिक’, असे एक नवे समीकरण माणसानेच निर्माण केले. या समीकरणाच्या आहारी जाऊन माणसाने निसर्गनियमांकडे पाठ फिरवली. परिणामी आजची भयावह स्थिती निर्माण झाली. याचा अनुभव आपण आपल्या दैनंदिन जीवनात नित्य घेत आहोत.
१. विकृतीमुळे माणसाचा विवेक नष्ट
निसर्गनियमांकडे पाठ फिरवल्याने माणसाने कृत्रिम वस्तूंना प्राधान्य दिले. निसर्गाची लूट केली. जंगले तोडली. भूजल साठा उपसला. खनिज तेलाचा आवश्यकतेपेक्षा अधिक उपयोग होऊ लागला. परिणामी विविध प्रकारच्या प्रदूषणांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मानवाला भौतिक सुख प्राप्त झाले; पण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मात्र बिघडले. मानव अधिकाधिक विकृतीकडे वळू लागला. विकृतीच माणसाला संस्कृती वाटू लागली. परिणामी माणसाचा सारासार विवेक नष्ट झाला, तरीही माणूस स्वतःला ‘सुशिक्षित’ आणि ‘विज्ञानवादी’ म्हणू लागला.
धूम्रपान आणि मद्यपान याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. आता तर राजरोसपणे मद्यपान केले जाते. लग्न समारंभ, मेजवान्या यांत मद्यपान हे प्रधानप्रेय बनत चालले आहे. मद्यपानाचे दुष्परिणाम ठाऊक असूनही मद्यपानाची निर्मिती होते आणि दिवसेंदिवस मद्यपींची संख्याही वाढत चालली आहे. स्त्री, पुरुष आणि तरुण मुले व्यसनाच्या पूर्ण अधीन झाले आहेत. ही सभ्य समाजाला लागलेली कीड आहे; पण याचे भानच राहिलेले नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
२. विकृती निर्माण न होण्यासाठी संस्कारांचे महत्त्व
मानवी समाजाला विकृतीपासून दूर ठेवण्यासाठी जुन्या जाणत्या लोकांनी विवाह संस्था निर्माण केली. माणसा माणसातील नातेसंबंध निर्माण करतांना आदर आणि वात्सल्य यांची भावना निर्माण केली. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला दादा, ताई, भाऊ, आक्का, माई, मावशी, आत्या, आजी, काका, बाबा, मामा, आजोबा, अशी विविध प्रकारची आदरयुक्त संबोधणे वापरण्याचा संस्कार करण्यात आला. त्यामुळे वडीलधार्या मंडळींमध्ये वात्सल्याची भावना निर्माण झाली. वात्सल्य भावना आणि आदरयुक्त मानवी समाजाचा एक मूलभूत आधारस्तंभ आहे. हा संस्कारही नैसर्गिक गुणधर्मावर आधारित आहे, हेही विसरून चालणार नाही. नैसर्गिक गुणांना बाजूला सारून ज्या वेळेला वेडेवाकडे मनात विचार येतात, त्या वेळेला ती विकृती होते. अशी विकृती संस्कारहिनतेचे लक्षण आहे. म्हणूनच कुणामध्येही विकृती निर्माण होऊ नये, यासाठीच संस्कार आवश्यक ठरतात. त्या संस्कारांकडेच आम्ही पाठ फिरवली आणि त्या संस्कारांनाच गावंढळ अन् मागास ठरवले. संस्कारांची कुचेष्टा केली. त्याची परिणीती बाहेरख्यालीपणात झाली.
३. विज्ञापनांमुळे सुखाच्या संस्कारात भर पडणे
यात भर पडली ती विज्ञापनांची ! उत्पादकांनी मानवाला आवश्यक नसलेल्या गोष्टींचे उत्पादन केले. ‘आम्ही उत्पादन केलेल्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत’, असे भासवण्यासाठी समाजातील लोकप्रिय लोकांना हाताशी धरून त्यांना विज्ञापनात घेतले. ‘ही मंडळी आम्ही निर्माण केलेल्या वस्तूंचा उपयोग करतात, त्याचा उपभोग घेतात. त्यामुळे तुम्हीही त्याचा उपयोग करा, त्याचा उपभोग घ्या’, हे तंत्र वापरले गेले. त्याचा परिणाम हळूहळू मानवी मनावर होऊ लागला आणि अनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याचे व्यसन माणसाला जडले, म्हणजेच ‘जेवढी अधिक भौतिक साधने, जेवढ्या अधिक वस्तू आपल्या घरात तेवढे अधिक सुख’, हा संस्कार विज्ञापनांनी मोठ्या प्रमाणावर केला. ही विज्ञापने आता घराघरांत पोचली आहेत. माणसाला अनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रेरणा देतात. अशा प्रकारे संस्कारांऐवजी मानवातील विकृती अधिकाधिक प्रकाशमान होतांना दिसते.
४. समलिंगी विवाह करण्याचा विचार अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिकच विकृत !
आता तर समलिंगी विवाहाचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला आहे. मुळातच ही संकल्पना निसर्गाच्या विरुद्ध आहे. मानवेतर कोणत्याही प्राणीसृष्टीत असा प्रकार आढळत नाही. अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी हा अधिक श्रेष्ठ आणि बुद्धीजीवी म्हणून ओळखला जातो. मानवाच्या तुलनेत अन्य प्राणी हे अत्यंत कनिष्ठ दर्जाचे आहेत. त्यांचे वर्तन सुद्धा निसर्गाला अनुरूप असेच असते. स्वतःला सुविद्य समजणारा माणूस मात्र निसर्गाच्या नियमांच्या विरोधात वागून स्वतःला अधिक शहाणा आणि पुढारलेला समजतो; पण ‘त्याचे वर्तन हे अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिकच विकृत झाले आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही, म्हणजेच समलिंगी विवाह करण्याचा विचार मानवाच्या मनात ज्या क्षणी येतो, त्या वेळेला तो अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिकच कनिष्ठ आणि विकृत ठरतो. तथापि याचे भान कुणालाही राहिले नाही. विचार आणि विवेक यांवर विकृती कशी मात करते ? आणि संपूर्ण मानवी समाज कसा हतबल होतो ? त्याचे चित्र आज आजूबाजूला पाहिल्यावर दिसते.
आज अशा विकृत माणसाने मद्यपानाची सवय पाळीव प्राण्यांनाही लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या काही चित्रफिती आपल्याला सामाजिक माध्यमांवर सहज आढळतात. कुत्रा, माकड या प्राण्यांनाही आता माणूस मद्य पाजू लागला आहे. ‘मद्यपान हे सभ्यतेचे लक्षण नाही’, असे संस्कार या आधी आपल्या समाजात दृढ झाले होते. तेच संस्कार आता मुळासकट उपटून टाकण्यात आले. तसाच प्रकार हा समलिंगी विवाहाविषयी आज घडतो आहे.
५. निसर्गाच्या विपरीत केलेले प्रत्येक वर्तन आणि आचार विकृतीच
कोणत्याही प्रकारची विकृती म्हणजे शेतामध्ये वाढलेल्या तणासारखी आहे. सकस पिकाला नष्ट करणारे तण काढून टाकावे लागतात, तरच समाजाला सकस अन्न प्राप्त होऊ शकते.
त्याचप्रमाणे तणासारखी वाढत जाणारी ही विकृती समूळ नष्ट केल्याखेरीज मानवी समाज निसर्गनियमांच्या चौकटीत राहून सुखाने जीवन जगू शकणार नाही. ‘निसर्गाच्या विपरीत केलेले प्रत्येक वर्तन आणि आचार विकृती आहे’, हे शिक्षण आता देण्याची वेळ उच्चभ्रू समजणार्या मानवी समाजात निर्माण झाली. किंबहुना असे संस्कार आता अपरिहार्य झाले आहेत, हेच खरे वेदनादायक आहे.
६. समलिंगी विवाह हा निसर्गनियमांच्या विरुद्ध असल्याने त्याज्यच !
ज्याला सभ्यतेची चाड आहे, अशा प्रत्येकाने मद्यपानाला प्रतिष्ठा देऊ नये. मद्यपान, व्यसनाधीनता ही विकृती आहे. तसेच समलिंगी विवाह हा निसर्गनियमांच्या विरुद्ध असल्याने त्याज्य असल्याचे संस्कार करण्याचे दायित्व आपल्या प्रत्येकावर आहे. आपण हे दायित्व पार पाडले नाही, तर ही विकृती अधिक वेगाने सर्वत्र पसरण्यास वेळ लागणार नाही आणि माणसाचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल अन् हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाचार्याची आवश्यकता नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.४.२०२३)