सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सहवासात अनुभवलेला अमृतधारांचा वर्षाव !
‘पुष्कळ वेळा कितीही आटापिटा केला, तरी एखादी गोष्ट घडतच नाही आणि कधी कधी ध्यानीमनी नसतांना अतिशय अमूल्य क्षण आयुष्यात अचानक घडून येतो. त्या अनुभूतीने आयुष्याचे सोने होते. अनेकदा अशक्य वाटणारी गोष्ट सहजतेने घडते. अनुभव, प्रचीती आणि अनुभूती वारंवार येऊ लागली की, लक्षात येते, ती शक्तीच हे सगळे घडवून आणते. मी केवळ निमित्तमात्रच आहे. या सगळ्याचा अर्थ पटकन लक्षात येत नाही. हळूहळू एकेक पदर उलगडत जातो.
प.पू. गुरुदेव श्री आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांचा सत्संग अचानक घडल्यानंतर मला या अनुभूतींची मालिकाच पुन्हा जगायला मिळाली. रोमारोमांतून, कणाकणांतून अमृतधारांचा वर्षाव झाला. आनंदाश्रू वाहू लागले. आजही तो क्षण पुन्हा आठवला की, तीच अनुभूती येते.
प्रख्यात बासरीवादक पंडित केशव गिंडे यांच्या जीवनावरील ‘नादब्रह्म’ हा लघुपट तयार होतांनाच एकेक दिव्य अनुभव येऊ लागले. माझी स्नेही अमृता धायरकर हिचे सासरचे कुलदैवत गोव्यातील माशेलचे देवकीकृष्ण ! आदल्या वर्षी ती सहकुटुंब दर्शन घेऊन आली. मलाही तेथून व्हिडिओ कॉल करून देवतेचे दर्शन घडवले. त्या वेळी ‘मी नक्की येणार देवकीकृष्णाच्या दर्शनाला’, असे मी सहज बोलून गेलो. त्याच वेळी ‘नादब्रह्म’ची सिद्धता पुण्यात चालू होती; पण त्यासाठी मला कुठले स्थळ पटतच नव्हते.
पंडित केशव गिंडेगुरुजींना भेटायला अमृता आली, तेव्हा तिने माशेलचा अनुभव त्यांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘अगं, हे तर आमचं कुलदैवत आणि आम्ही तिथले पुजारी !’’ आणि ‘नादब्रह्म’चा प्रवास चालू झाला. त्या निमित्ताने आम्ही माशेलला गेल्यानंतर तेथून आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पोहोचलो. तिथल्या संशोधन कार्यात, व्यवस्थेत हरखून गेलो. प.पू. श्री गुरुदेवांच्या सत्संगाने तो परमोच्च क्षण घडून आला ! केवढे परमभाग्यच ! गुरुदेव मला आणि अमृताला सांगत होते, ‘‘विचारा तुमच्या मनात काय असेल ते !’’ त्या वेळच्या संवादातून आमच्या आयुष्याचा अर्थबोध घडून येत होता. एकेक पदर उलगडत होता.
‘‘हे सगळे दैवी अनुभव तुम्हाला का येतात ? तुम्ही सांगा मला. थोडक्यात नको, सविस्तर सांगा. तुम्ही हे सगळे अनुभव लिहा. मी त्याचं पुस्तक काढणार आहे’’, हे गुरुदेवांचे आशीर्वाद वेगळीच ऊर्जा देऊन गेले. त्यांच्याच कृपेने या अनुभूती आता कागदावर उतरायला उतावीळ झाल्या आहेत. हीच ती पहिली अनुभूती…!
श्री गुरुदेव दत्त..!!’
– श्री. गिरीश केमकर, विभागप्रमुख, फिल्म डिव्हिजन, डेक्कन सोसायटी, पुणे. (२४.४.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |