शांत, स्वावलंबी आणि वक्तशीर असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी, गोवा येथील श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८३ वर्षे) !
‘वैशाख कृष्ण तृतीया (८.५.२०२३) या दिवशी श्री. अरविंद कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचा ८३ वा वाढदिवस झाला. मी आणि श्री. कुलकर्णीकाका रामनाथी आश्रमात एकाच खोलीमध्ये निवासाला आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. शांत : श्री. कुलकर्णीकाकांचा स्वभाव शांत असून ते मीतभाषी आहेत.
२. वक्तशीरपणा : काका प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठतात आणि रात्री ८.३० वाजता झोपतात. यात पालट होत नाही. ते दिवसा झोपत नाहीत.
३. स्वावलंबी : काकांचे वय ८३ वर्षे असूनही, ते प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याचा प्रयत्न करतात.
अ. ते त्यांचे सुकलेले कपडे व्यवस्थितपणे घड्या घालून ठेवतात.
आ. चिकित्सालयातून त्यांना दिलेली औषधे ते ठरलेल्या वेळी आणि सांगितल्याप्रमाणे घेतात. ते त्यांचे पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळतात.
४. नियमितपणा : ते सकाळी आणि सायंकाळी नित्यनेमाने आरतीसाठी जातात.
५. निरपेक्ष वृत्ती : त्यांना कुणाकडूनही साहाय्याची किंवा वस्तूंची अपेक्षा नसते.
६. नामस्मरण करणे : ते वेळोवेळी ध्यानमंदिरात किंवा संत नामजप करतात, त्या खोलीत बसून नामस्मरण करतात.
७. आज्ञापालन : ते भोजनकक्षातील फलकावर लिहिलेल्या सूचना वाचून, तशी कृती करतात आणि आम्हालाही त्याची आठवण करून देतात.
८. सेवाभाव
अ. ते रामरक्षा आणि नवग्रह यांचे स्तोत्रपठण करायला जायचे, तेव्हा ते आसंद्या लावण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी साहाय्य करायचे.
आ. आम्ही रहात असलेल्या माळ्यावर काही साधक सेवा करतात. काका त्या साधकांच्या सेवेच्या ठिकाणी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक देण्याची सेवा करतात.
इ. भोजनकक्षात साधकांना वाचण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’चे जे अंक ठेवले जातात, त्या सर्व अंकांच्या काका व्यवस्थित घड्या घालून ते अंक नीट ठेवतात.
९. काकांचे पूर्ण कुटुंब पूर्णवेळ साधनेत आहे. ‘मुलांनी (मुलगा श्री. राहुल कुलकर्णी आणि मुलगी कु. रूपाली कुलकर्णी यांनी) साधनेसाठी अधिकाधिक वेळ द्यावा’, असे त्यांना वाटते.
१०. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘श्री. कुलकुर्णीकाकांची आध्यात्मिक पातळी चांगली (६३ टक्के) आहे. त्यांची अशीच पुढेही प्रगती होऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो. ‘मला अशा ऋषितुल्य साधकांचा सहवास दिला’, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०२३)