प्रसारमाध्यमांनी राष्ट्रहित जपावे !
एखाद्या सूत्रावर जनमत सिद्ध करणे, लोकजागृती करणे, लोकांच्या विचारांना दिशा देण्यासाठी चर्चा करणे आणि त्याविषयीची विविध अंगे अभ्यासपूर्णरित्या लोकांसमोर आणणे, हे प्रसारमाध्यमांचे कार्य आहे. लोकमान्य टिळक यांनी दैनिक ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांमधून अखंड जनजागरणाचे कार्य चालवले होते. त्यांच्या धारदार लेखणीने लोकांमधील देशभक्तीचे स्फुलिंग अक्षरशः धगधगत ठेवले. त्यांच्या सर्व अग्रलेखांनी मराठी समाजातच नव्हे, तर समस्त भारतात विचारांच्या लाटा निर्माण केल्या. याला ‘प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर’, असे म्हणू शकतो; मात्र गेल्या ३ दशकांपासून माध्यमांचा कल पाहिल्यास तो राष्ट्रहितासाठी नक्कीच नाही, असेच खेदाने म्हणावे लागते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिल्याची घोषणा केल्यानंतर सर्व वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांमध्ये पुष्कळ बातम्या प्रसिद्ध झाल्या. वृत्तवाहिन्यांवर केवळ हीच ‘ब्रेक्रिंग न्यूज’ होती. यामध्ये पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे कसे होणार ? अध्यक्ष कोण ? पक्षातील अंतर्गत बंडाळी, नेते आणि कार्यकर्ते यांची भावनिक साद, नेते अन् कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया इत्यादी बातम्या होत्या. जणू काही देशात आणि राज्यातील सर्व समस्या संपलेल्या आहेत, अशा अविर्भावात राहून प्रसारमाध्यमे काय साध्य करत आहेत ? असेच कुणालाही वाटेल.
संपूर्ण लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर केंद्रित करून त्याविषयी बातम्या देणे याला ‘राष्ट्रहित’ न म्हणता ‘पक्षहित’ म्हणता येईल. वाढत्या स्पर्धेमुळे वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या देण्यांची जीवघेणी स्पर्धा चालू झाली आणि याचा हळूहळू भस्मासूर होऊ लागला. टी.आर्.पी.च्या नादात यांची पातळी इतकी खालावली की, ‘यांच्यावर बंदी किंवा निर्बंध आणावेत’, असा सूर उमटू लागला आहे. या प्रसारमाध्यमांनी स्वतःची एक आचारसंहिता पाळावी, अशी अपेक्षा असतांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जे चालू आहे, त्याला पाहून आपणाला ‘भीक नको; पण कुत्रा आवर’, असे म्हणायची वेळ आली आहे, हे नक्की ! जसाजसा काळ पुढे चालला आहे, तसा या वाहिन्यांमधील परिपक्वपणा, समंजसपणा वाढण्याच्या ऐवजी बालिशपणा, बाजारू वृत्ती, उथळ बातम्या देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अंतर्मुख होऊन कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे ? याचा विचार करावा !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई