सनातन संस्थेच्या वतीने वाराणसीमध्ये ‘जीवनात आध्यात्मिक साधनेचे महत्त्व’ प्रवचन पार पडले !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेच्या वतीने येथील बारई गाव आणि नक्खीघाट येथे ‘जीवनात आध्यात्मिक साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. बारई गाव येथील स्थानिक रहिवासी डॉ. स्वतंत्र तिवारी यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त या प्रवचनाचे आयोजन केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘जीवनात साधना करणे आवश्यक आहे; कारण साधना केल्याने आत्मबळ मिळून आपले मन स्थिर राहू शकते. सध्याच्या काळात नामजप हीच साधना आहे.’’ या कार्यक्रमाचा लाभ अनेक ग्रामस्थांनी घेतला. या वेळी उपस्थितांनी त्यांच्या परिसरातही असा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.