मणीपूर हिंसाचार : ख्रिस्त्यांच्या आक्रमकतेचा परिणाम !
भारताच्या ईशान्येकडील मणीपूर राज्य गेल्या ६-७ दिवसांपासून हिंसाचाराने ग्रस्त आहे. तेथून मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत. ३ मे या दिवशी कुकी आणि नागा समाजाने काढलेल्या निषेधफेरीला हिंसक वळण लागल्यानंतर झालेल्या संघर्षात आतापर्यंत ५४ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. येथील चुराचंदपूर जिल्हा हा हिंसेचे मुख्य केंद्र बनला आहे. इंफाळ हे सुरक्षित शहरांपैकी एक आहे. भौगोलिकदृष्ट्या मणीपूर राज्य दर्याखोर्या आणि टेकड्या यांचे बनले आहे. येथील मैती समाज हा खोर्यांमध्ये, तर नागा आणि कुकी समाज हा टेकड्यांवर अन् डोंगरावर रहातो. मैती समाज हा हिंदु असून राज्यातील त्याच्या लोकसंख्येचे प्रमाण ५५ टक्के आहे. नागा आणि कुकी समाज हा ख्रिस्ती धर्मीय आहे. लोकसंख्येत त्यांचे प्रमाण मैती समाजाच्या खालोखाल आहे.
हिंदूंना लाभ मिळवून देण्यास विरोध
सध्या हिंसाचाराची अनेक कारणे सांगितली जातात, त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मणीपूर उच्च न्यायालयाने मैती समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याचा दिलेला निर्णय ! मणीपूर राज्यात म्यानमार आणि बांगलादेश येथून घुसखोर मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे स्थानिक मैती लोकांचे जीवन असुरक्षित झाले आहे. घुसखोर स्थानिक मैती समाजाच्या भूमी बळकावण्याचा, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. ‘आपल्या पूर्वजांचा वारसा, संस्कृती, भाषा सर्वच घुसखोरांच्या समस्येमुळे संकटात येत आहे’, असे मैती समाजाला वाटते. त्यामुळे मैती समाजाने न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यावर त्यावर न्यायालयाने त्यांचा अनुसूचित जमातीत प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. घुसखोरांचा हिंदु असलेल्या मैतींना त्रास होतो; कारण ते खोर्यात आहेत, तर नागा आणि कुकी टेकड्यांवर असल्याने त्यांचे घुसखोरांविषयी काही म्हणणे नाही. ‘मैतींचा आदिवासी प्रवर्गात समावेश केल्यामुळे ते आमची भूमी, संपत्ती हडपतील’, अशी भीती नागा आणि कुकी यांना वाटते. येथेच संघर्षाचे मुख्य कारण आहे. मैती आणि कुकी यांच्यामध्ये तसा अधूनमधून संघर्ष अथवा तणावाची परिस्थिती निर्माण होत असली, तरी एवढे भयावह स्वरूप त्याला नव्हते. ख्रिस्ती कुकींच्या विद्यार्थी संघटना, भटक्या-विमुक्त संघटना या रस्त्यावर उतरून सरकार आणि न्यायालय यांच्या निर्णयाला विरोध करत आहेत. त्यात ३ मे या दिवशी कुकी समाजाशी संबंधित एका वास्तूला आग लागण्याचे निमित्त झाले आणि कुकी समाजाचा भडका उडाला. मणीपूर येथून या हिंसाचाराचे जे व्हिडिओ समोर येत आहेत, त्यामध्ये स्पष्ट दिसते आहे की, कुकी समाज कशा प्रकारे हिंसाचार, लुटालूट करत आहे ? या समाजाच्या काही संघटनांच्या अनेक लोकांच्या हातात बंदुका, रायफल असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मैती समाजाच्या दुकानांची लुटालूट, सरकारी संपत्तीची हानी कुकी मोठ्या प्रमाणात करत आहेत. राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्नही एका व्हिडिओत दिसतो. त्यामुळे राज्यपालांनी दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश दिले.
ख्रिस्त्यांची दादागिरी
ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला, तर कुकी हे मूळचे मणीपूरमधील नसून त्यांचे मूळ चीनमध्ये असल्याचे लक्षात येते. ते म्यानमार, बांगलादेश येथील सीमावर्ती भागातून येथे येऊन स्थायिक झाले आहेत. ते मूळ ख्रिस्ती नव्हते; मात्र त्यांनी गत काही वर्षांमध्ये ख्रिस्ती पंथ स्वीकारला आहे. हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे नेमकेपणाने लोकांना हिंसाचार होण्याचे, तो वाढण्याचे मूळ कारण काय असू शकते ? हे लक्षात यावे. काही दिवसांपूर्वी सरकारने चुराचंदपूर येथील डोंगरांवरील राखीव जागांवर कुकी समाजाच्या नागरिकांनी अतिक्रमण केले म्हणून वन विभागाच्या कर्मचार्यांनी त्यांना हुसकावून लावले होते. मणीपूर येथे वन विभागाच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी या जागा पुन्हा वन विभागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळेही सरकारविरुद्ध नागा आणि कुकी यांचा रोष आहे. यातून मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह हे भाजपचे ‘हिंदुत्वनिष्ठ’ असल्याने त्यांच्याविरुद्ध राज्यात वातावरण तापवण्याचा प्रयत्न असू शकतो. सैन्य आणि शीघ्र कृती दल यांना पाचारण केल्याने थोडा तणाव निवळून परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
घुसखोरांची कुकी समाजाला काही भीती वाटत नाही, हे आश्चर्य आहे आणि ते हिंदु मैती समाजासमवेत सशस्त्र संघर्ष करण्यास मात्र पुढे येत आहेत. हिंदु समाज हा सहिष्णु आहे. त्यात मैती समाजातील बहुतांश जण हे ब्राह्मण आहेत. अल्पसंख्यांकांची संख्या थोडी वाढली, तरी ते हिंदूंना त्रास देण्यास प्रारंभ करतात. हिंदूंच्या खालोखाल संख्या झाली की, मग मात्र ते शक्ती दाखवण्यास प्रारंभ करतात. तेथे बिचारे हिंदूच मार खातात. अल्पसंख्यांकांच्या या वृत्तीतील पालट लक्षात येण्यास त्यांना पुष्कळ वेळ लागतो. जेव्हा कठीण परिस्थिती येते, तेव्हा त्यांना प्रतिकार करण्यासही उसंत मिळत नाही. ख्रिस्ती अथवा मुसलमान असो, हिंदूंनी कधीही धर्म म्हणून नकार देऊन त्यांना त्यांच्या वाड्या, वस्त्या येथे रहाण्यास आडकाठी केलेली नाही. नेहमी स्वागतच केले आहे, तेही वैयक्तिक स्तरावर; मात्र जेव्हा अल्पसंख्यांक म्हणवणार्यांकडून हिंदु संस्कृती, परंपरा, हिंदूंची संपत्ती यांवर आक्रमण केले जाते, ते हिंदु समाजाचे म्हणून ! हा महत्त्वाचा भेद आहे. अल्पसंख्यांक लोक ‘धर्म’ म्हणून संघटित असतात आणि परिणामी बहुसंख्य हिंदूंच्या नाकीनऊ आणतात, हेच मणीपूर येथील घटनांतून पुन्हा एकदा लक्षात येते. मणीपूर हिंसाचाराला अन्य काही कारणे असली, तरी तथाकथित शांतीप्रिय आणि मानवतावादी ख्रिस्त्यांची आक्रमकताच मूळ कारण आहे. हिंदु समाज, सरकार यांना अल्पसंख्यांक म्हणवणारे कसा रंग दाखवतात ? हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने धोरणे ठरवणे आवश्यक आहे.
मणीपूर येथील हिंदु मैतींविरुद्ध ख्रिस्ती कुकी अन् नागा यांचा संघर्ष हा ख्रिस्त्यांच्या धर्मांधतेचाच परिणाम ! |