सातारा येथे ८ वीतील मुलीची विक्री करून तिच्यावर बलात्कार !
सातारा, ७ मे (वार्ता.) – आठवीत शिकणार्या एका शाळकरी मुलीची साडेतीन सहस्र रुपयांत विक्री करून एका महिलेने तिला एका अनोळखी पुरुषाच्या कह्यात दिले. त्या पुरुषाने मुलीला शहरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ९ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी भारती अमित कट्टीमणी या महिलेवर आणि अज्ञात पुरुष यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (यातून समाजाची नैतिकता किती खालावली आहे, तसेच गुन्हा करण्याची गुन्हेगारांना कुठलीच भीती वाटत नाही, हे लक्षात येते. अशा राज्यात मुली-महिला कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ? – संपादक)
पीडित मुलगी शहरातील एका शाळेत ८ वीत शिकत आहे. २८ एप्रिल या दिवशी भारती यांनी ‘बाहेरचे लोक येणार आहेत. आपल्याला त्यांच्यासोबत जायचे आहे’, असे सांगून पीडित मुलीला फिरायला घेऊन गेली. भारतीने मुलीला थेट एका लॉजवर नेले. तिथे एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीकडून साडेतीन सहस्र रुपये घेऊन मुलगी त्या व्यक्तीच्या कह्यात दिली. त्या व्यक्तीने शाळकरी मुलीवर लॉजच्या खोलीमध्ये बलात्कार केला. मुलगी रडू लागल्यावर तिला दमदाटी केली. पीडित मुलीची आई बाहेरगावी होती. घडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आईला ‘मेसेज’ करून सांगितली. आईने आल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित महिला आणि अनोळखी व्यक्ती यांच्यावर मुलीची विक्री करून बळजोरीने बलात्कार करणे, बाल लैंगिक अत्याचार आदी कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.