जालना येथे ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ५०० जणांचे लचके तोडले !
७ सहस्र मोकाट कुत्र्यांची दहशत !
जालना – शहरातील विविध रस्त्यांवर बिनधास्तपणे वावरणारे मोकाट कुत्रे वाहनांवर झेपावतात. ये-जा करणार्या नागरिकांसह लहान मुलांच्या पाठीमागे लागतात. शहरात प्रतिदिन ६ ते ११ जणांचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत. नगरपालिकेकडून प्रतिवर्षी निर्बिजीकरणासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते; परंतु ७ वर्षांनंतर एकदाही निर्बिजीकरण करण्यात आलेले नाही. शहरात उघड्यावरच मटनांची दुकाने असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे.
१. ४ लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहरात ७ सहस्र मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. मागील ३ वर्षांत ५ सहस्र ४७५ जणांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याची नोंद झाली आहे.
२. कुत्र्यांचा विषय नगरपालिकेच्या सभेत वारंवार चर्चिला गेला; परंतु मोकाट श्वानांविषयी बंदोबस्त आजही झालेला नाही.
३. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. शहरातील बहुतांश भागात मोकाट कुत्र्यांचे जत्थेच्या जत्थे फिरत असतात.
४. ही कुत्री अचानक आक्रमण करून महिलांसह, आबालवृद्ध आणि लहान मुले यांना घायाळ करण्याचे प्रमाण वाढले आहे.
५. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे; परंतु यावर कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही.
६. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार होत आहेत. जिल्हा रुग्णालयातील रेबीज विभागात लहान मुले, ज्येष्ठ, महिला आणि पुरुष अशांवर प्रतिदिन ४० ते ६० जणांवर उपचार करावे लागते.
७. निर्बिजीकरणासाठी चालू वर्षात १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निर्बिजीकरण कोण करणार आणि कधी करणार ? निर्बिजीकरण करण्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. येत्या ४ मासांत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
वारंवार निवेदने देऊनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यामुळे कांचननगर, शिवनगर आणि नूतन वसाहत या भागांत चांगलाच हैदोस आहे. उघड्यावर होणार्या मांसविक्रीमुळे ही संख्या वाढत आहे. कॉलनीत अनेकदा लहान मुलांचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. आता लवकरच आंदोलन करणार आहोत. – शशिकांत घुगे, माजी नगरसेवक निर्बिजीकरण होत नाही आणि शहरात उघड्यावर मटण विक्रेत्यांची दुकाने यांमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाने याविषयी गांभीर्याने घ्यायला हवे. – ओमप्रकाश चितळकर, प्रदेश सचिव, राष्ट्रीय समाज पक्ष |
संपादकीय भूमिका :-मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असतांना नगरपालिका प्रशासन काय करत आहे ? |