सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मृत्यूला आनंदाने सामोरे जाण्याची मनाची सिद्धता असलेले पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) !
‘होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी हिने लिहिलेल्या वडिलांसंदर्भातील लेखाप्रमाणे आतापर्यंत कोणीही लेख लिहिलेला नाही. तिचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! आरतीची साधनेत प्रगती होण्याला तिचे वडीलही उत्तरदायी आहेत. त्याबद्दल आरतीसह त्यांचेही कौतुक करावे, तेवढे थोडे ! दोघांची पुढील आध्यात्मिक प्रगती आणखीन जलद गतीने होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१८.४.२०२३) |
१. वडिलांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती !
‘माझ्या वडिलांचे (पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांचे) वय ७४ वर्षे असून त्यांना मेंदूचा आजार झाला असल्यामुळे त्यांना विस्मृती होते. त्यांना अधूनमधून आध्यात्मिक त्रासही होतो. ते मागील २ वर्षे रुग्णाईत असून त्यांची शारीरिक स्थितीही बिकट आहे. त्यांचे सर्व जागेवरच करावे लागते. त्यांना अधिक वेळ बसता येत नाही आणि सुस्पष्टपणे पुरेसे बोलता येत नाही. बाबा माझ्या आईकडे पत्नी म्हणून न पहाता ‘आई’ (म्हणजे शक्तीस्वरूप देवी) म्हणून पहातात. ते आईला म्हणतात, ‘‘तुझ्यामुळे मला शक्ती मिळते.’’ ते आईशी बोलतांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे भासतात. सध्या ते माझ्याकडे (गोव्याला) रहायला आले आहेत.
२. वडिलांची स्मृती चांगली राहिली नसतांनाही त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण असणे
बाबांच्या डोक्यात गाठी झाल्या होत्या. त्यावरील उपचारानंतरही ते पूर्ववत् बरे झाले नाहीत. त्यांची स्मृती पुरेशी परत आली नसल्याने त्यांना कधी कधी आमच्या नात्याचेही विस्मरण होते; परंतु त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचे विस्मरण होत नाही.
३. वडिलांनी कुटुंबियांना बोलावून त्यांचा अंतिम काळ जवळ आल्याविषयी सांगून क्षमायाचना करणे
‘एक दिवस सकाळी माझ्या वडिलांनी मला आणि आईला (सौ. सविता तिवारी (वय ७२ वर्षे) हिला) बोलवून सांगितले, ‘‘देवाने मला सुचवले आहे, ‘आता माझी जाण्याची वेळ जवळ आली आहे. माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करा. माझे बरेच चुकले आहे, मला क्षमा करा. देवा, मला क्षमा कर.’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘बाबा, आमच्याकडूनही बरेच चुकले आहे, आम्हालाही क्षमा करा.’’ त्यानंतर आम्ही त्यांच्याजवळच बसून होतो.
४. वडिलांची शारीरिक स्थिती नाजूक असूनही त्यांनी रामनाथी आश्रमात येण्याची सिद्धता दर्शवणे
त्याच्या दुसर्याच दिवशी काही कारणाने आम्ही रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जाणार होतो. तेव्हा बाबांनीही आश्रमात येण्याची सिद्धता दाखवली. बाबांची शारीरिक स्थिती तशी नाजूकच असल्यामुळे ‘त्यांना अधिक वेळ बसता येईल कि नाही ?’, हे आम्हाला कळत नव्हते; परंतु बाबांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी विशेष ओढ वाटत असल्यामुळे त्यांनी आश्रमात येण्याची सिद्धता दर्शवली. देवाच्या कृपेने आमची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली.
५. वडिलांची स्थिती नाजूक असतांनाही त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रगल्भ व्यक्तीप्रमाणे संवाद साधणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत बाबांचा संवाद झाला. तो येथे दिला आहे.
बाबा : भगवंता, तुम्ही भेटलात, फार छान वाटले !
परात्पर गुरु डॉ. आठवले : मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला. ‘तुम्ही साधनेत पुष्कळ पुढे आहात’, हे पाहून आनंद झाला.
बाबा : तुमच्यापेक्षा नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : बर, ‘इथे असलेल्यांमध्ये सर्वांत पुढे आहात’, हे बरोबर आहे ना ? अजून काय म्हणता ?
बाबा : भगवंता, आता पुढचेही सर्व तुम्हीच करून घ्या.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमचे पुढचे सर्व झालेलेच आहे ना !
(बाबा आध्यात्मिक प्रगती करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत, हे मी बाबांना समजावून सांगितले. – आरती)
बाबा : भगवंता, अजून माझा मृत्यू होणे बाकी आहे. ‘मृत्यूनंतरही पुढचे सर्व सुरळीत होणे’, हे केवळ तुमच्याच कृपेने शक्य आहे. तुम्हीच सर्व करवून घ्या.
५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीनंतर बाबांचा विस्मृतीचा त्रास ९० टक्के उणावणे : बाबांनी परात्पर गुरु डॉक्टरांशी सहजतेने साधलेला संवाद ऐकून ‘ते मागील २ वर्षे रुग्णाईत असून त्यांना विस्मृती होते आणि त्यांची शारीरिक स्थिती बिकट आहे’, असे कुणालाही वाटणार नाही; पण ‘बाबांचा परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेला संवाद किंवा त्यांना मृत्यूच्या क्षणांची चाहूल लागल्यावर त्यांनी आमच्याशी केलेला संवाद’, हा एखाद्या प्रगल्भ व्यक्तीप्रमाणे होता. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीनंतर बाबांचा विस्मृतीचा त्रास ९० टक्के उणावला आहे’, असे माझ्या लक्षात आले.
६. वडिलांना ‘त्यांचा मृत्यू होणार’, असे देवाने सुचवल्यावर साधनेमुळे त्यांच्या मनात मायेतील विचार न येता त्यांनी कुटुंबियांकडे क्षमायाचना करून देवाने दिलेल्या आयुष्यासाठी समाधान व्यक्त करणे
देवाने बाबांना ‘त्यांचा मृत्यू होणार’, असे सुचवले, तेव्हा बाबांच्या जागी अन्य कुणी रुग्ण असता, तर त्यांना त्यांच्या मुलाबाळांची आठवण येणे किंवा मृत्यूची भीती आणि काळजी वाटणे, इत्यादी त्रास होऊ शकले असते; पण बाबांनी लगेच आमच्याकडे क्षमायाचना केली. त्यांनी देवाने दिलेले आयुष्य आणि साहाय्य यांसाठी समाधान व्यक्त केले. त्यांनी मुलगा, सून किंवा नातेवाईक यांची आठवण काढली नाही. ‘बाबांना हे सर्व केवळ साधनेमुळेच शक्य होत आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले. ‘साधक, संत, सत्संग’, असा विषय चालू असतांना त्यांचा चेहरा आनंदी दिसतो. त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही. त्यांनी सहजतेने मृत्यू स्वीकारण्याची मनाची सिद्धता केली आहे आणि आमचीही करून घेतली आहे’, असे मला जाणवले.’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, फोंडा, गोवा.
(हे लिखाण पू. सत्यनारायण तिवारी संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख ‘पू.’ असा केलेला नाही. – संकलक)
साधनेमुळे सर्व परिस्थिती शांतपणे स्वीकारणारे संभाजीनगर येथील पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७४ वर्षे) !
१. साधनेपूर्वी वडिलांची सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे असलेली स्थिती !
‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू करण्यापूर्वी माझे वडील (श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी, वय ७४ वर्षे) सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे नोकरी करून जीवन जगत होते. त्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज यांच्याकडून अपेक्षा होत्या. त्यांना ‘मुलांनी चांगले शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे, राजकारणात त्यांना मानाचे स्थान मिळावे, समाजाने चांगले वागावे’ इत्यादी अपेक्षा होत्या; परंतु तसे न झाल्याने त्यांना निराशा आली होती.
२. समाजाकडून अनेक कटू अनुभव येऊनही वडील नेहमी प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने वागल्यामुळे त्यातून त्यांची साधना होणे
बाबांनी लहानपणी पुष्कळ कष्ट भोगले आहेत. त्यांना काही वेळा एक वेळ उपाशीही रहावे लागले आहे. त्यामुळे त्यांना नेहमी ‘समाजासाठी काहीतरी कार्य करावे’, असे वाटायचे; पण त्यांना समाजकार्य किंवा राजकारण इत्यादींमध्ये बरेच कटू अनुभव आले. असे असूनही त्यांनी कधी भ्रष्टाचार केला नाही किंवा कधी कुणाला फसवले नाही. वर्तमानस्थितीत समाज किंवा जनमानस पहाता ‘एखादा चांगला माणूसही वाईट मार्गाला लागेल’, अशी स्थिती आहे; मात्र अनेक वेळा समाज आणि नातेवाईक यांच्याकडून प्रतिकूल प्रतिसाद मिळूनही बाबांनी स्वतःमधील प्रामाणिकपणा आणि नैतिकता सोडली नाही. ‘यातून त्यांची तपश्चर्याच (साधनाच) झाली’, असे मला वाटते.
३. वडिलांनी साधना चालू केल्यावर त्यांच्या मनाच्या स्थितीत झालेले पालट !
३ अ. ‘देवाने राजकारण किंवा नातेवाईक यांत अडकू दिले नाही’, यासाठी वडिलांना कृतज्ञता वाटणे : राजकारणात कटू अनुभव आल्यानंतर बाबा साधनेकडे वळले. बाबांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर त्यांच्या विचारांत पालट झाला. आता त्यांना वाटते, ‘बरे झाले नातेवाइकांनी अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, नाहीतर मी त्यांच्यात अडकलो असतो, मुलाबाळांच्या मायेत राहिलो असतो किंवा राजकारणात अडकलो असतो. देवाने मला त्यापासून मुक्त केले.’ आता बाबांना ‘सर्वकाही देवाच्या हातात आहे आणि जे होते, ते चांगल्यासाठीच’, असे वाटून देवाप्रती कृतज्ञता वाटते.
३ आ. साधनेत येण्याआधी बाबांना फार राग येत असे; मात्र आता त्यांचा राग उणावला आहे.
३ इ. शारीरिक स्थितीविषयी दुःख न वाटणे
१. बाबा खाणे-पिणे, नातेवाईक किंवा मनोरंजन यांत अडकले नाहीत. ‘रुग्णाईत स्थितीमुळे काही उपभोगता येत नाही’, याचे त्यांना दु:ख वाटत नाही. ते विरक्त झाले आहेत.
२. शारीरिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांना सतत पडून रहावे लागते; मात्र त्याविषयी त्यांचे काहीच गार्हाणे नसते. त्यांना काही त्रास होत असेल, तरी ते सहन करतात. त्यांची सहनशक्ती वाढली आहे.
३ ई. ‘वडील पूर्वी सर्वांसाठी प्रार्थना करत असणे, आता ‘सर्व देवच करतो’, या विचारांनी ते शांत रहात असणे : बाबांना देवाकडे प्रार्थना करतांनाही स्वतःपुरते मागणे आवडत नसे. ते नेहमी ‘सर्वांना सुखी ठेव, आनंदी ठेव’, अशी प्रार्थना करायचे. आता त्यांची ती स्थितीही पालटली असून ‘देवच सर्व करणार आहे, त्याला सगळे कळते’, या भावाने ते शांत रहातात. त्यांची मनाची स्थिती शांत आणि समाधानी झाली आहे. ते सतत कृतज्ञताभावात रहातात.
३ उ. अनेक गुण वाढणे : साधनेमुळे बाबांचे देवाशी असलेले अनुसंधान वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये ‘निरपेक्षता, नैतिकता, व्यापकता, कर्तेपणा नसणे, कृतज्ञताभाव, त्यागी वृत्ती, मृत्यूची भीती नसणे’, असे अनेक गुण वाढून त्यांचे व्यक्तीमत्त्व चांगले झाले आहे.
व्यावहारिक दृष्ट्या विचार केला, तर बाबांचा जीवनप्रवास कठीणच होता; परंतु केवळ साधनेच्या बळावर त्यांनी स्वतःमधील चांगुलपणा टिकवून ठेवला. केवळ मानसिक स्तरावरील विचारांनी माणसातील चांगुलपणा टिकून राहू शकत नाही, तर भगवंताचे नाम, सत्संग आणि अनुसंधान यांनीच ते शक्य होते. बाबांमुळे मला हे जवळून अनुभवता आले. बाबांची देवाविषयी असलेली ओढ आणि अनुसंधान यांमुळेच ते जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले.
४. कृतज्ञता
गुरुदेवा, बाबांना केवळ गुरुकृपा आणि साधना यांमुळेच सर्व शक्य झाले आहे. आम्हाला साधनामार्गात आणून आमच्यावर अखंड गुरुकृपा करणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, फोंडा, गोवा.
|