देवावर श्रद्धा असण्याचे महत्त्व !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना शेषनागाच्या फण्यांचे दर्शन होणे आणि नंतर एका सेकंदात शेषनागाच्या ७ मुखांचे रूपांतर व्याघ्रमुखात झाल्याचे दिसणे अन् त्या दृश्याचा भावार्थ ‘सूक्ष्मयुद्धात शेषनागासह देवीचे वाहन वाघही साहाय्याला आले’, असा असणे
‘११.२.२०२१ या दिवशी मी दुपारी झोपले असता अकस्मात् मला शेषाच्या फण्यांचे दर्शन झाले आणि एका सेकंदात शेषाच्या ७ मुखांचे रूपांतर व्याघ्रमुखात झाल्याचे दिसले. त्या वेळी मला वाटले, ‘देव सांगत आहे की, आज चालू असणार्या सूक्ष्मयुद्धात शेषासह देवीचे वाहन असणारे वाघही साहाय्याला आले आहेत.’ आपल्याला ‘देव सूक्ष्मातून आपल्यासाठी काय काय करत आहे !’, याची कल्पना येत नाही. गुरुकृपेमुळे देव आपले आपत्काळातही रक्षण करणार आहे. सूक्ष्मातून काहीतरी दिसल्यावर आपल्याला वाटते, ‘देव आपल्या समवेत आहे’; परंतु प्रत्येक क्षणीच आपली अशी श्रद्धा असली पाहिजे की, ‘देव सतत माझ्या समवेत आहे. तो माझे प्रत्येक कर्म पहात आहे. तोच माझा आधार आहे. तोच माझी साधना करवून घेणार आहे आणि तोच माझे रक्षण करणार आहे.’
आपले त्याच्याशी सतत अनुसंधान असले पाहिजे, तरच आपली साधना अखंड होईल. ‘भगवंता, ‘आम्हाला तशी बुद्धी आणि शक्ती दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१२.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |