अडचणीच्या प्रसंगी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
१. कार्यालयातील काही अडचणींमुळे मासिक वेतन न मिळणे आणि त्याच मासात उपनेत्रासाठी अधिक व्यय करावा लागल्यामुळे पैसे संपणे
‘कार्यालयातील काही अडचणींमुळे मला एक मास माझे वेतन मिळाले नव्हते. मला माझ्या उपनेत्रासाठी (‘लेन्ससाठी’) त्याच मासात अधिक व्यय करावा लागला होता. त्यामुळे माझ्याकडे काहीच पैसे शेष नव्हते. आईची औषधे आणि घरातील आवश्यक वस्तू आणायच्या असल्याने मी अस्वस्थ झाले होते. मी माझ्या एका मैत्रिणीला भ्रमणभाष करून ‘ती मला काही साहाय्य करू शकते का ?’, असे विचारले; पण तिच्याकडेही पैसे नव्हते.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यातून मार्ग दाखवणार’याची निश्चिती असल्यामुळे त्यांना प्रार्थना करणे
मी घरी आल्यानंतर देवापुढे दिवा लावला आणि श्रीकृष्णाला प्रार्थना केली. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील त्यांच्या छायाचित्राकडे पहात मी त्यांना प्रार्थना करू लागले, ‘गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), मी काय करू ? तुम्हीच मला मार्ग दाखवा.’ आतापर्यंत मला प्रत्येक प्रसंगात त्यांनीच साहाय्य केले होते आणि ‘आताही तेच मला मार्ग दाखवणार’, याची मला निश्चिती होती.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर दुसर्या मैत्रिणीने साहाय्य करण्याविषयी आपणहून विचारणे
मी सतत प्रार्थना करत होते. साधारण अर्ध्या घंट्यानंतर माझ्या दुसर्या एका मैत्रिणीचा मला भ्रमणभाष आला आणि ती मला म्हणाली, ‘‘गेल्या मासात तुझा अधिक व्यय झाला होता ना ? तुला पैशांची काही आवश्यकता आहे का ?’’
४. गुरुदेवांच्या कृपेमुळेच साहाय्य मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त होणे
दुसर्या मैत्रिणीने मला साहाय्य करण्याविषयी विचारल्यावर ‘गुरुदेवांनीच हा विचार तिच्या मनात घातला’, असे मला जाणवले. मला अगदी भरून आले. मी प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे कृतज्ञतेने पहात होते. ‘मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या कृपेमुळेच माझे जीवन सहज आणि आनंदी झाले आहे. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. गायत्री ओ. एम्., कण्णूर, केरळ. (११.११.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |