दुर्धर आजाराने त्रस्त असणार्या महिलांना मिळणार आर्थिक साहाय्य !
चिपळूण नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची योजना
चिपळूण – नगर परिषद हद्दीतील दुर्धर आजाराने त्रस्त असणार्या महिलांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबवली जात आहे. कर्करोग (कॅन्सर), हृदयरोग, किडनी, अर्धांगवायू आदींसारख्या दुर्धर आजाराची लागण झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यासाठी १५ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
४ ते १५ मे २०२३ पर्यंत येथील नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्र येथे अर्ज करता येणार असून प्रथम येणार्यास प्राधान्य दिले जाईल, तसेच विहित मुदतीत प्रविष्ट केलेल्या परिपूर्ण अर्जांचा विचार केला जाईल.
या संदर्भातील अधिक माहिती महिला व बालकल्याण विभागप्रमुख प्रसाद साडविलकर यांच्याकडे मिळणार आहे. नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती विभागामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा अर्ज मिळणार आहे. या अर्जासमवेत रहिवासी पुरावा, शिधापत्रिका (रेशनकार्ड), आधारकार्ड, बँक पासबुक ‘झेरॉक्स’ (नाव, खाते क्रमांक, आय.एफ्.सी.कोड क्रमांक आदी माहिती), मतदान ओळखपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
रुग्ण भूमीहीन, अल्पभूधारक, दारिद्य्र रेषेखालील अथवा स्वातंत्र्यसैनिक असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. रुग्ण दुर्धर रोगाने पीडित असल्याचे प्राधिकृत वैद्यकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेचा लाभ इच्छुक महिलांनी घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आणि महिला व बालकल्याण समिती प्रमुख प्रसाद साडविलकर यांनी केले आहे.