गोव्यात १२ वीचा निकाल ९५.४६ टक्के
पणजी, ६ मे (वार्ता.) – गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२ वीच्या परीक्षेचा निकाल ९५.६४ टक्के लागला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली आहे. पर्वरी येथील उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेट्ये पुढे म्हणाले, ‘‘यंदा एकूण १९ सहस्र ३७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी १८ सहस्र ४९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींची टक्केवारी ९५.८८ टक्के असून मुलांची टक्केवारी ९५.०३ टक्के आहे. ४९ विद्यार्थ्यांचे निकाल विविध कारणांमुळे राखून ठेवण्यात आले आहेत. यावर्षी कला शाखेतील ९५.१६ टक्के विद्यार्थी, वाणिज्य शाखेतील ९६.५२ टक्के, विज्ञान शाखेतील ९६.१० टक्के आणि ‘व्होकेशनल’ शाखेतील ९२.७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७५ खासगी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांपैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आय.टी.आय. मध्ये ४३ जण परीक्षेला बसले होते. त्यांपैकी ३० जण उत्तीर्ण झाले. १४१ दिव्यांग (विकलांग) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांपैकी १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेली २ वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा शिक्षण मंडळाने प्रत्येक शैक्षणिक वर्षात २ सत्रांत परीक्षा घेतल्या. या दोन्ही सत्रांतील परीक्षांचे गुण ग्राह्य धरून शेवटचा निकाल सिद्ध करण्यात आला.
बारावीच्या परीक्षेचा सविस्तर निकाल https://results.gbshse.net/#/ आणि https://www.gbshse.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.