मणीपूरमध्ये २ समुदायांतील हिंसेत आयकर अधिकार्याची हत्या !
इंफाळ – मणीपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी समुदायांमध्ये चालू असलेल्या हिंसेत लेमिनथांग हाओकिप नावाच्या एका आयकर अधिकार्याची हत्या करण्यात आली. आंदोलकांनी भाजपचे आमदार वुंगजागिन वाल्टे यांच्यावर प्राणघातक आक्रमण करून त्यांना गंभीररित्या घायाळ केले. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका कमांडोची सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
१. राज्यातील आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजांमध्ये चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १३ सहस्र लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे, असे सैन्यदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. राज्यात सर्वत्र निमलष्करी दलांचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
२. हिंसाचाराच्या काळात राज्यातील शाळा, महाविद्यालये, घरे आणि वाहने यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मणीपूरमधील अनेक भागात रस्त्यांवर जळलेल्या वाहनांच्या रांगा पहायला मिळत आहेत. राज्यात परिस्थिती सामान्य असली, तरी तणावाचे वातावरण आहे.