लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र अक्कलकोट !
श्री क्षेत्र अक्कलकोट हे ठिकाण सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनित झालेले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून लाखो भक्तांच्या मनोकामना स्वामींच्या चरणी पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या तीर्थक्षेत्री मुख्यत्वेकरून श्री वटवृक्ष मंदिर, श्रींच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तू, तसेच अन्य काही गोष्टी आहेत. सध्या याचे व्यवस्थापन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाते. सध्या श्री. महेश कल्याणराव इंगळे हे देवस्थानचे अध्यक्ष असून त्यांच्यासह एकूण ९ विश्वस्त याचे कामकाज पहातात.
संकलक – श्री. अजय मुकुंद केळकर, कोल्हापूर आणि श्री. आनंद कल्याणी खजुरगीकर, अक्कलकोट
१. देवस्थानमधील नित्यक्रम
देवस्थानमध्ये प्रतिदिन पहाटे ५ ते ५.१५ काकड आरती, सकाळी ७.३० ते ९.३० भक्तांचे अभिषेक, सकाळी ११.३० ते ११.४५ नैवैद्य-आरती, प्रत्येक गुरुवारी रात्री ७.४५ ते ९ पालखी सोहळा, रात्री ९ ते १० शेजारती आणि रात्री १० वाजता मंदिर बंद केले जाते.
२. देवस्थानमध्ये वर्षभर होणारे काही उत्सव
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन, श्रीरामनवमी, हनुमान जयंती, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, नवरात्र, श्रीपाद वल्लभ पुण्यतिथी, श्री नृसिंहसरस्वती जयंती, रामदास नवमी, महाशिवरात्री, श्री संत तुकाराम बीज
३. देवस्थानच्या वतीने दिल्या जाणार्या सुविधा आणि राबवण्यात येणारे उपक्रम
३ अ. भक्त निवास
३ अ १. भक्तनिवासामध्ये स्वतंत्र अशा ५ इमारती भक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. भरपूर पाणी, स्वतःची विद्युत् व्यवस्था, २२८ खोल्या आणि ७ प्रशस्त सभागृह अशा सर्व सुविधायुक्त परिपूर्ण व्यवस्था आहे. मैंदगी-गाणगापूर रस्त्यावर हे भक्त निवास आहे.
३ आ २. श्री स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये आलेल्या सर्व घटनांचा मागोवा घेऊन प्रसिद्ध स्वामी चित्रकार कै. अरुण फडणीस यांच्या कुंचल्यातून प्रकटलेले चित्रमय प्रदर्शन भक्त निवासात पहाण्यास उपलब्ध आहे.
३ इ ३. देवस्थानच्या भक्त निवासातील सुसज्ज भोजन कक्षात एकाच वेळी ५०० भक्तांना बसता येईल, अशी व्यवस्था आहे.
३ आ. समर्थांची गोशाळा : श्री स्वामी समर्थांनी गायींची सेवा केलेली आहे. अत्यंत पवित्र अशा गोरस, गोमेय, गोमूत्र यांचा उपयोग स्वामींच्या पूजेत व्हावा, पवित्रता वाढावी यासाठी देवस्थानने भक्त निवासात महाराजांच्या चरणी दान आलेल्या गायींची गोशाळा काढली आहे. गोमेयापासूनच स्वामींचा अंगारा सिद्ध केला जातो.
३ इ. देवस्थानची रुग्णसेवा : भक्तगणांच्या देणगीतून उभारलेल्या रुग्णालयास प्रारंभ झाला असून येथे नाममात्र दरात सेवा उपलब्ध आहे. देवस्थानची स्वतंत्र रुग्णवाहिकाही सेवेत रुजू आहे.
३ ई. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे ‘कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)’ : ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनातील महागडे शिक्षण इथेच मिळावे, यासाठी ‘कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन’ उभारण्यात आले आहे. येथे बांधकाम, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग कार्यरत आहेत. देवस्थानचे तंत्रनिकेतन वसतीगृहही आहे. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना २ वेळेस विनामूल्य भोजन-प्रसाद, तसेच शैक्षणिक साहित्याचे साहाय्य केले जाते.
३ उ. मुरलीधर मंदिर : हे मंदिर देवस्थान लगत असून श्री गिरीधर, मुरलीधर सुकुमारांची अत्यंत देखणी मूर्ती या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. गोकुळाष्टमी, गीता जयंती, आषाढी, कार्तिकी, तुकाराम बीज, रामदास नवमी, कोजागरी असे उत्सव येथे मोठ्या प्रमाणात चालतात. वैष्णवांच्या सहस्रो दिंड्या येथे येऊन हरिनाम सप्ताह करतात.
३ ऊ. देवस्थानचे विठ्ठल मंदिर, शिशु विद्या मंदिर आणि श्रीराम मंदिर ! : अनुमाने २०० वर्षांपूर्वीची हेमाडपंती बांधणी असलेली सुंदर इमारत ‘उपलप विठ्ठल मंदिर’ नावाने प्रसिद्ध आहे. वर्ष १९९६ मध्ये गरीब कुटुंबातील बालकांच्या शिक्षणासाठी देवस्थानच्या वतीने शिशु मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. स्टेशन रोड येथील श्रीरामाचे मंदिर देवस्थानात सामील झाले असून येथे नैमित्तिक उपक्रम होतात !
प्रतिदिन १५ सहस्रांहून अधिक भाविकांना विनामूल्य महाप्रसाद पुरवणारे अक्कलकोट येथील ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट’ !
श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अक्कलकोट येथे वर्ष १९८८ मधील गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी त्यांच्या सहकार्यांसह भिक्षा मागून मिळालेल्या केवळ ३ किलो तांदळाच्या प्रसादाच्या साहाय्याने या मंडळाची स्थापना केली. अन्नछत्र स्थापन करणार्या संस्थापक सदस्यांमध्ये सनातन संस्थेचे साधक श्री. आनंद कल्याणी खजुरगीकर यांचा समावेश आहे. सध्या या अन्नछत्रात प्रतिदिन १५ ते २० सहस्र स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. हा महाप्रसाद सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेस असतो. सध्या ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट’चे श्री. अमोलराजे भोसले हे या न्यासाचे ‘मुख्य कार्यकारी विश्वस्त’ म्हणून सेवा पहात आहेत. गेली ३५ वर्षे अखंडपणे चालू असलेल्या या अन्नछत्राचा परिचय आणि कार्य येथे थोडक्यात देत आहोत.
संकलक – श्री. अजय मुकुंद केळकर, कोल्हापूर आणि श्री. आनंद कल्याणी खजुरगीकर, अक्कलकोट
१. ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’च्या वतीने शहरासाठी देण्यात आलेले योगदान !
अ. फत्तेसिंह मैदानावर नागरिकांसाठी ४० सिमेंटचे बाक बसवण्यात आले आहेत आणि मैदानावर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले आहे.
आ. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (‘एस्.टी.’च्या) चालक आणि वाहक यांसाठी अन्नछत्रालगत ५ एकर जागेत वाहनतळ सिद्ध करून त्या ठिकाणी त्यांच्यासाठी १०८ खाटांचे विश्रांतीगृह उभारण्यात आले आहे.
तेथे असलेल्या विहिरीचे नूतनीकरण करून तेथील आजूबाजूच्या नागरिकांना पाण्याची सोय करून दिली आहे. ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गळोरगी येथील स्वमालकीच्या विहिरीतून अन्नछत्रासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना ५ कोटी रुपये व्यय करून सिद्ध केली आहे आणि वटवृक्ष देवस्थानलाही पाणी देऊ केले आहे.
इ. हा न्यास गरीब आणि गरजवंतांना नेहमीच वैद्यकीय अन् शैक्षणिक साहाय्य करतो. सामाजिक बांधिलकी म्हणून वर्ष १९९३ च्या किल्लारी येथे झालेल्या भूकंपाच्या प्रसंगी अन्नछत्राच्या माध्यमातून एक मास अन्नदान केले आहे.
ई. अन्नछत्र परिसरातील डांबरी आणि सिमेंट काँक्रीट रस्ते, प्रशस्त वाहनतळ, २५० के.व्ही. क्षमतेचा सोलर (सौर) विद्युत् प्रकल्प, यात्रीभवन, स्वामींची ३० फुटी उभी मूर्ती, छत्रपती शिवरायांची सिंहासनाधिष्ठित मूर्ती, कपिला गाय यांची प्रतिकृती अन् दीपमाळ उभारण्यात आली आहे.
उ. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात अलीकडेच शिवसृष्टी (गडकिल्ले सृष्टी) आणि शिवचरित्र धातूशिल्प प्रदर्शन साकारण्यात आले आहेत.
ऊ. न्यासाच्या वतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सव, तसेच १० दिवसांचे धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य असे आयोजन केले जाते.
ए. दळणवळण बंदीच्या कालावधीत शेकडो लोकांना अन्नवाटप करण्यात आले.
२. विशेष
अ. २०० हून अधिक गरीब-दिव्यांग यांना प्रतिदिन २ वेळचे पुरेल एवढ्या प्रसादाचा पुरवठा ! : न्यासाच्या ‘समर्थ महाप्रसाद सेवा योजने’च्या अंतर्गत अक्कलकोट शहरातील सुमारे २०० हून अधिक गोरगरीब, दिव्यांग, गरजवंतांना घरपोच दैनंदिन दोन वेळचे पुरेल इतके अन्न डब्यातून पोचवण्याचे कार्य हे न्यास करत आहे.
आ. मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री. अमोलराजे भोसले यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट तालुक्यातील ११७ ग्रामपंचायती, ३ नगरपालिका यांसह विविध शासकीय कार्यालये यांना एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला अनुसरून मंडळाचे कार्य अनेक वर्षे चालू असून गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेले ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ हे स्फूर्तीगीत आजही ऐकल्यावर ऊर्जा मिळते’, असे संस्थापक जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
३. आगामी नियोजन
‘सध्याचे जुने महाप्रसादगृह शेडच्या ठिकाणी नियोजित भव्य महाप्रसादगृह बांधण्याचे नियोजन आहे. सदरची इमारत ही ५ मजली आणि मंदिरसदृश्य वास्तू असणार आहे. यातील २ मजले महाप्रसादगृहाचे असून एकाच वेळी २ सहस्र ५०० स्वामीभक्त महाप्रसाद घेऊ शकतील, तसेच ३ मजले प्रतीक्षा कक्षाचे असून यामध्ये एकाच वेळी अनुमाने ५ सहस्र स्वामीभक्त बसू शकतील. यांसह स्वयंपाकगृह, भाजीपाला विभाग, चपाती मशीन विभाग, भांडी स्वच्छता यंत्र विभाग यांसह अन्य विभागही असतील. या इमारत बांधकामाचा अंदाजित व्यय ५५ कोटी रुपये इतका आहे. अल्पावधीत सदर इमारतीचे बांधकाम चालू करण्याचा न्यासाचा मनोदय आहे’, असे श्री. अमोलराजे भोसले यांनी सांगितले.