८ मेपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई होणार ! – नवी मुंबई आयुक्त
४२४ लघुउद्योजकांनी मालमत्ताकर न भरल्याचे प्रकरण
नवी मुंबई, ६ मे (वार्ता.) – महापालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता कर न भरणार्या ४२४ लघुउद्योजकांवर मालमत्ता कर विभागाने कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. या थकबाकीदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ८ मेपासून नोटिसा बजावण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. ‘कर वसुलीसाठी प्रसंगी न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या मालमत्ताही सील करण्याची कारवाई करण्यात येईल’, असेही ते म्हणाले.
महापालिका क्षेत्रात अनुमाने १ सहस्र ६५० लघुउद्योजक असून त्यापैकी मालमत्ता कराची मूळ रक्कम भरणारे ५९७ आहेत. नियमितपणे कर भरणारे ४९७ जण असून त्यांच्याकडून सुमारे ९ कोटी ५० लाख रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. अद्यापपर्यंत एकदाही मालमत्ता कर न भरणारे ४२४ लघुउद्योजक आहेत. या थकबाकीदारांकडून अनुमाने १५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम पालिकेला येणे बाकी आहे.