कराड येथील गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी कार्यरत असणार्या नगरपरिषदेच्या विरोधात ‘गोरक्षण बचाव समिती’चे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण !
कराड, ६ मे (वार्ता.) – येथील गोप्रेमी, तसेच परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या, तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या भाजी मंडई येथील गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून दबावतंत्राचा वापर करत कराड नगरपरिषदेने गोप्रेमी, तसेच परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवण्याचे काम आरंभले आहे. याच्या विरोधात ‘गोरक्षण बचाव समिती’च्या वतीने सोमवार, ८ मे या दिवशी सकाळी ११ वाजता येथील तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
५ मे या दिवशी गोरक्षण संस्थेस कोणतेही पूर्वकल्पना न देता किंवा विश्वासात न घेता गोरक्षण केंद्राची शासकीय मोजणी अधिकार्यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. गेल्या १०० वर्षांपासून या ठिकाणी गोपालनाचे काम करण्यात येत आहे. कत्तलीसाठी नेण्यात येणार्या गायी, भेकड जनावरे यांची गोरक्षकांनी सुटका केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या गोरक्षण केंद्रात अशा गायींचे संगोपन करण्यात येते. सध्या या ठिकाणी ३० हून अधिक गायींचा सांभाळ करण्यात येत आहे. या ठिकाणी पुरातन असे श्रीकृष्ण मंदिरही आहे. परिसरातील गोप्रेमी, तसेच हिंदु बांधव सण-उत्सव, तसेच धार्मिक कार्यासाठी या ठिकाणी येऊन गोग्रास देत असतात. सध्या या जागेच्या वादावरून न्यायालयात खटला प्रविष्ट आहे.
एकीकडे महाराष्ट्र सरकार गायींच्या संगोपनासाठी आयोग नेमत असतांना या ठिकाणी मात्र गायींचा निवारा काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. कराड नगरपरिषद तथा प्रशासनाच्या या दडपशाहीच्या विरोधात ‘गोरक्षण बचाव समिती’च्या वतीने करण्यात येणार्या लाक्षणिक उपोषणास गोप्रेमी, तसेच शहरातील सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘गोरक्षण बचाव समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकागोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी गोप्रेमींच्या महाराष्ट्रात करण्यात येणारी दडपशाही संतापजनक ! |