परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. ‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या मंगलमय रथोत्सवात मला सहभागी होता आले. त्या वेळी ‘खरोखर माझ्या जन्माचे सार्थक झाले’, असे वाटून गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. ज्या मार्गावरून रथ जाणार होता, त्या मार्गावर दुतर्फा साधक उभे होते. त्या प्रत्येक साधकाकडे पाहून त्यांच्या चेहर्यावरील आनंद आणि त्यांची भावविभोर झालेली स्थिती पाहून माझा कंठ दाटून येत होता. ‘सर्व साधक गुरुदेवांच्या दर्शनासाठी आतुर झाले होते’, असे मला वाटले.
३. ‘रथात साक्षात् श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आणि देवी स्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ विराजमान आहेत’, हे ऐकून माझा आनंद गगनात मावत नव्हता.
४. रथ मार्गक्रमण करत असतांना वेगवेगळ्या नामजपांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. तेव्हा नामजप ऐकत असतांना ‘नामजपाची धून देवलोकातून ऐकू येत आहे’, असे मला जाणवले.
५. रथोत्सवाचे हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. ते क्षण अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहेत.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला रथोत्सवात देवाच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) मागून चालण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अशोक रेणके, फोंडा, गोवा. (५.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |