कलियुगातील द्रष्टे ऋषि : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सूक्ष्मातून जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
नित्य हरिचरणांचे स्मरण करावे. त्यामुळे देहरोग आणि भवरोग (विषयांची आसक्ती) दोन्ही दूर होतात ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
आज ७ मे २०२३ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने……
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे दत्तावतारी संत होते. त्यांनी अनेक भक्तांना साधना सांगून त्यांचा उद्धार केला. पृथ्वीवरील त्यांचे वास्तव्य, म्हणजे भक्तांना नित्य मिळणारी दिव्यत्वाची अनुभूतीच. असे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वाच्या चरणी भावपूर्ण वंदन करून त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे.
१. पूर्वजन्म
द्वापरयुगात वैशंपायन ऋषि हे महर्षि व्यासांचे शिष्य आणि कृष्ण यजुर्वेदाचे प्रवर्तक होते. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे याच वैशंपायन ऋषींचा अंशावतार होते. त्यामुळे ते वैशंपायन ऋषींप्रमाणे ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध होते, तसेच त्यांच्या नावामध्येही ‘वैशंपायन’ हा शब्द अंतर्भूत होता.
२. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
२ अ. दत्तावतारी संत : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे एक दत्तावतारी संत होते. त्यांच्यामध्ये दत्तगुरूंचे तत्त्व असल्यामुळे अनेक भक्तांना त्यांना पाहून श्रीदत्तगुरूंचेच साक्षात् दर्शन होत होते आणि दिव्यत्वाची अनुभूती येत होती. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही दत्तगुरूंप्रमाणे भव्य आणि दिव्य स्वरूपाचे होते.
२ अ १. दत्ततत्त्वातील ब्रह्मतत्त्व प्रकट होणे : जेव्हा त्यांच्यातील ब्रह्मतत्त्व प्रकट होत होते, तेव्हा त्यांची वाणी ही ‘ब्रह्मवाणी’ आणि लिखाण हे ‘ब्रह्मवाक्य’ यांच्या स्वरूपात कार्यरत होऊन त्यांतून अखंड ज्ञानगंगा वहात होती. त्यामुळे अनेक भक्त त्यांच्याकडून पाझरणार्या ज्ञानामृताचे प्राशन करून धन्य होत होते.
२ अ २. दत्ततत्त्वातील विष्णुतत्त्व प्रकट होणे : जेव्हा त्यांच्यातील विष्णुतत्त्व प्रकट होत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये श्रीविष्णुप्रमाणे भक्तांप्रतीचा ‘भक्तवत्सलता’ हा गुण प्रकट होत होता. त्यामुळे ते दैवी वात्सल्याने भक्तांवर भरभरून प्रीतीमय कृपा करत होते. त्यामुळे भक्तांना त्यांचा लळा लागला होता.
२ अ ३. दत्ततत्त्वातील शिवतत्त्व प्रकट होणे : जेव्हा त्यांच्यातील शिवतत्त्व प्रकट होत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये शिवाप्रमाणे वैराग्य जागृत होत होते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक कर्म हे निष्काम कर्मयोग्याप्रमाणे निरपेक्षपणे आणि निःस्वार्थीपणे केवळ जनकल्याणासाठी होत होते.
२ आ. उच्च कोटीच्या साधनेमुळे योगबळ प्राप्त होऊन सूक्ष्मातून दैवी प्रवास करून हिमालयातील ऋषीमुनींच्या संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन करणे : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याकडे असलेल्या योगबळाने ते सूक्ष्मातून प्रवास करून एका क्षणात पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी पोचू शकत होते. तसेच ते क्षणार्धात हिमालयात पोचून तेथे अनेक वर्षे तप करणार्या ऋषीमुनींशी सुसंवाद साधून त्यांना मार्गदर्शन करत होते.
२ इ. कठोर साधना करून तपोबळ अर्जित करणे : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे अनेक मास निराहार राहून किंवा जलामध्ये अनुष्ठान करून कठोर साधना करत होते. त्यामुळे त्यांनी पुष्कळ तपोबळ अर्जित केले होते. या तपामुळे ते तपस्वी ऋषींप्रमाणे तेज:पुंज दिसत होते. त्यांच्या देहाभोवती दिव्य तेज आणि दिव्य आभा सतत कार्यरत रहात होती. या तपोबळाच्या जोरावर ते पाताळातील अनिष्ट शक्तींशी सूक्ष्मातून सतत युद्ध करून त्यांचा नाश करून साधकांचे रक्षण करत होते.
२ ई. त्रिपुटीवर विजय प्राप्त करून तुर्या, तुर्यातीत आणि शेवटी उन्मनी अवस्था प्राप्त होणे : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी ‘जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती’, या ३ अवस्था पार करून ‘तुर्यावस्था’ प्राप्त केली होती. याच अवस्थेत राहून ते वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत पृथ्वीवर दैवी कार्य करत होते. ९० ते ९९ या वर्षापर्यंत त्यांची ‘तुर्यातीत’ अवस्था कार्यरत असल्यामुळे ते अधिक वेळ मौन धारण करून एकांतात राहून साधनारत होते. त्यांच्या आयुष्याची ९९ वर्षे पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांच्या देहत्यागाची वेळ समीप आली, तेव्हा त्यांच्या ‘तुर्यातीत’ अवस्थेचा लोप होऊन ‘उन्मनी’ अवस्था कार्यरत झाली. त्यामुळे त्यांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या ज्योर्तिमयस्वरूपाच्या लिंगदेहाचा तेजांश दत्ततत्त्वात विलीन झाला आणि त्यांचा नादमय दिव्यांश सत्यलोकात कार्यरत झाला. हाच नादमय दिव्यांश ‘ॐ’काराच्या स्वरूपात सत्यलोकात विराजमान असून तो आकाशतत्त्वाच्या स्तरावर संपूर्ण ब्रह्मांडात कार्यरत आहे. याच ‘ॐ’काररूपी नादातून निर्माण होणारी दिव्य ज्ञानशक्ती सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मतम स्तरावर नादलहरी, सूक्ष्मतर स्तरावर विचार आणि सूक्ष्म स्तरावर जाणिवा किंवा अनुभूती यांच्या स्वरूपात प्राप्त होऊन त्यांना सूक्ष्मातील ईश्वरी ज्ञान शब्दांच्या रूपाने स्थुलातून प्राप्त होते. अशा प्रकारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सत्यलोकातील सूक्ष्मतम अस्तित्व ज्ञानशक्तीच्या बळावर स्थुलातून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी पृथ्वीवर, म्हणजे भूलोकात कार्यरत आहे.
२ उ. खडतर योगसाधनेद्वारे अनेक दैवी सिद्धी प्राप्त केलेल्या असणे : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी ब्रह्मांडातील विविध लोकांमध्ये ज्योती, विद्युत्लहरी किंवा दिव्यशलाका आणि प्रकाशझोत यांच्या स्वरूपात विराजमान असणार्या दिव्य शक्ती अन् पुण्यात्मे यांना योगसाधनेद्वारे प्रसन्न करून घेतले होते. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्यामध्ये विविध दैवी सिद्धींच्या स्वरूपात दैवी ऊर्जा कार्यरत असल्यामुळे त्यांनी अनिष्ट शक्तींचा त्रास होत असलेल्या किंवा तीव्र प्रारब्धाने ग्रासलेल्या अनेक जिवांची मुक्तता केली. त्याचप्रमाणे त्यांच्यावर श्रीमहालक्ष्मीदेवी, श्री भुवनेश्वरीदेवी, श्री कामाख्यादेवी आणि श्री त्रिपुरसुंदरीदेवी यांसारख्या अनेक देवींची अन् धनकुबेर यांची भरभरून कृपा झाली होती.
२ ऊ. अहंशून्य आणि विनम्र व्यक्तीमत्त्व : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन गुरुपदावर विराजमान असूनही त्यांच्यामध्ये लेशमात्रही अहं नसून त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र होता. त्यामुळे ते त्यांच्या संपर्कात येणारे अनेक संत, सिद्धपुरुष अाणि योगीजन यांचे मन सहजरित्या जिंकून त्यांना आपलेसे करत होते. त्यांच्या अहंशून्य आणि विनम्र व्यक्तीमत्त्वामुळे त्यांनी ‘परमहंस’ हे अध्यात्मातील अत्युच्च पद प्राप्त केले होते.
२ ए. पतितांचा उद्धार करणे : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे परात्पर गुरुपदावर विराजमान असल्यामुळे त्यांना भक्तांचा लोभ होता. त्यामुळे त्यांनी देशविदेशातील अनेक पतितांचा उद्धार केला आहे. त्यांच्या कृपेमुळे अनेक जिवांचे प्राण वाचणे, जीव घेणे आणि जुनाट रोग पूर्णपणे बरे होणे, आर्थिक स्थिती सुधारणे, कुटुंबात सौख्य नांदणे, मन:शांती आणि समाधान लाभणे, अशा विविध प्रकारच्या अनुभूती अनेकांना आलेल्या आहेत.
२ ऐ. जनकल्याणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले असणे : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे योगगुरु, ज्ञानगुरु, तपोगुरु, परात्पर गुरु आणि अवतारी गुरु या रूपाने अखंड कार्यरत होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले होते. त्यामुळे ते अनेकांचे आधारस्तंभ होते. त्यांनी निःस्वार्थ बुद्धीने केलेले जनकल्याणाचे कार्य पाहून समाजातील अनेक प्रतिष्ठित लोक त्यांच्याकडे आकृष्ट होऊन त्यांचे शिष्यत्व स्विकारत होते आणि त्यांच्या कार्यात सहभागी होत होते.
२ ओ. : सनातन संस्थेवर विशेष कृपा असणे : ‘श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अवतरले आहेत’, याचे दिव्य ज्ञान योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांना होते. त्यामुळे त्यांची सनातन संस्थेवर विशेष कृपा होती. त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये दैवी सिद्धींचा प्रयोग करून समष्टी स्तरावर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अनेक सूक्ष्मातील अडथळे दूर केले आहेत. ते सनातन संस्थेला सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करून साहाय्य करतात. त्यांनी सनातनच्या आश्रमांचे रक्षण करण्यासाठी शिवाच्या गळ्यांतील नऊ नागांचे प्रतीक स्वरूप असणारे सूक्ष्मातील सात्त्विक पिवळे नाग, अदृश्य पुण्यात्मे आणि दिव्य शक्ती यांना आश्रमाच्या भोवती स्थापन केले आहे. त्यामुळे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.
२ औ. कलियुगातील द्रष्टे ऋषि : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा आध्यात्मिक अधिकार इतका होता की, ते काळाचा पडदा पार करून भविष्य पाहू शकत होते. त्यांनी जगभरातील विविध देशांमध्ये रहाणार्या अनेक व्यक्तींच्या भविष्यात घडणार्या घटनांचे भाकित आधीच करून ठेवले होते. ते कलियुगातील द्रष्टे ऋषीच होते. त्यांच्या कृपेने कलियुगातील अधर्मी (त्रासदायक) कालचक्राची दिशा पालटून ती धर्मचक्राच्या दिशेने कार्यान्वित झालेली आहे. त्यामुळे पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी काळाची अनुकूलता १० ते ३० टक्के इतक्या प्रमाणात लाभली आहे.
३. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी विविध योगमार्गांनी केलेल्या साधनेचे स्वरूप आणि त्यांना साधनेमुळे प्राप्त झालेले आध्यात्मिक पद किंवा अवस्था
अशा प्रकारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे कलियुगातील द्रष्टे ऋषिच होते. त्यांची गुणवैशिष्ट्ये शब्दबद्ध करणे निवळ अशक्य आहे. त्यामुळे आम्हा साधकांचा भाव त्यांच्या चरणी भावसुमनांजलीच्या स्वरूपात अर्पण करून त्यांच्या चरणी कोटीश: आणि शब्दातीत कृतज्ञता व्यक्त करते. तसेच ‘त्यांची कृपादृष्टी आम्हा सर्व साधकांवर अखंड राहो’, हीच त्यांच्या चरणी आर्त प्रार्थना करते.’ (१.५.२०२३)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट अनेकदा दूर करणेयोगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे अवतारी संत असल्यामुळे ते श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी भक्तीमय आणि प्रीतीमय नात्याने जोडल्यामुळे त्यांचे परस्परांशी स्नेहसंबंध होते. तसेच दोघांमध्ये सख्यभाव जाणवत होता. प.पू. दादाजी वैशंपायन यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची संपूर्ण व्याप्ती ठाऊक असल्याने ते त्यांचे तपोबळ, योगबळ आणि ज्ञानबळ पणाला लावून पाताळातील बलाढ्य आसुरी शक्ती आणि मृत्यूच्या रूपाने आलेल्या काळाशी शर्थीने लढून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट दूर करत होते. त्यांच्या कृपेमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अनेक प्रसंगांमध्ये जीवनदान मिळून त्यांच्या मनुष्य रूपातील अवतारीदेहाच्या आयुष्याची वृद्धी झालेली आहे. – कु. मधुरा भोसले |