कोल्हापूर येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा पार पडला !
कोल्हापूर, ४ मे (वार्ता.) – संध्यामठ, छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा ३ मे या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला. हे दत्त मंदिर कै. उमेश सरनाईक (नाना) यांनी पुढाकार घेऊन वर्ष १९६४ मध्ये स्थापन केले. हे दत्त मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी या मंदिराच्या जिर्णाेद्धारासाठी निधी उपलब्ध करून दिला.
३ मे या दिवशी सकाळी ८.३० वाजता पालखी मिरवणुकीद्वारे दत्तमूर्तीचे आगमन झाले. यानंतर सकाळी ९ वाजता भागातील महिलांच्या हस्ते तोरण आणि गारवा आणण्यात आला. या प्रसंगी सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती. सकाळी ११ वाजता सत्यनारायण पूजा, होम, तसेच सायंकाळी ६ वाजता शिवसेनेचे युवानेते श्री. ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांचा सत्कार आणि रात्री महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शैलेश साळोखे, उपाध्यक्ष अनिकेत सरनाईक, खजिनदार कपिल साळोखे यांसह मंडळाचे अन्य कार्यकर्ते पुढाकार घेऊन गेली १५ वर्षे दत्त जयंती सोहळा, तसेच वर्षभर नैमित्तिक उपक्रम राबवत आहेत. मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात.