मंदिरांवर आधारित विलक्षण अर्थव्यवस्था !
मंदिरांवर आधारित अर्थव्यवस्था भारतात पूर्वापार आहे. एक मंदिर केवळ काही लोकांचाच नाही, तर लाखो लोकांचा उदरनिर्वाह वहाते. मंदिरातील देवाच्या पूजेसाठी पूजासामग्री, साहित्य ज्यामध्ये फुले, फळे, श्रीफळ, बेल, तुळशी, दुर्वा, प्रसादाचे पदार्थ, उदबत्ती, गंध, दीप, कापूर इत्यादी असतात. मंदिरांच्या ठिकाणचे विक्रेते हे साहित्य विकून त्यातून आपला उदरनिर्वाह करतात. ज्या मंदिरांच्या ठिकाणी विशिष्ट विधी केले जातात, त्यासाठी विधीचे साहित्य सिद्ध करणे, उदा. पिंडदानाच्या ठिकाणी पिठाचे पिंड बनवणे, पूजनासाठी देवतांच्या प्रतिकात्मक आकृत्या बनवणे यासाठी स्थानिक महिलांना किंवा ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळतो. मोठ्या देवस्थानांच्या ठिकाणी, उदाहरणार्थ तिरुपती, शिर्डी येथे लाखो लोक प्रतिदिन दर्शनासाठी येतात. सर्वांनाच मंदिरांच्या भक्त निवासात रहाता येत नाही. त्यासाठी हॉटेल, लॉज, धर्मशाळा येथे रहावे लागते. भोजनालये, उपाहारगृहे येथे भोजन-अल्पहार घ्यावा लागतो. त्यामुळे तेथील कर्मचार्यांचा उदरनिर्वाह होतो. तीर्थक्षेत्रातील रिक्शा, टॅक्सीवाले, बसचालक, खासगी प्रवासी वाहने यांना आर्थिक लाभ होतो. मंदिरातील स्वच्छतेपासून ते पादत्राणे, महाप्रसाद अशा व्यवस्थेत शेकडो लोक लागतात. मंदिरात सातत्याने धार्मिक कार्यक्रम होत असल्याने केटरिंगवाले, मंडप, डेकोरेशनवाले यांना रोजगार मिळतो. संगीत, ढोल-ताशा, तबला, बासरी इत्यादी वादक, तसेच गायक यांनाही बिदागी मिळते. मंदिरासाठी शेकडो सुरक्षा कर्मचारी कार्यरत असतात. मंदिराच्या परिसरातच मूर्ती किंवा धार्मिक ग्रंथ विकणारे, दैनंदिन वापरातील वस्तू विकणारे, धोतर, कुर्ते अशी वस्त्रे विकणारे इत्यादी अनेकांना रोजगार मिळतो.
अशा प्रकारे मंदिर सहस्रोंचे पालनपोषण करते. मंदिराच्या ठिकाणी लाखो लोक येत असल्यामुळे त्या क्षेत्रातील प्रशासनाचा चांगले रस्ते, वीजव्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था चांगल्या दर्जाची उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. रेल्वेस्थानक, बसस्थानक यांची व्यवस्था शासनाला करावी लागते. भारतात पूर्वापार शेती आधारित व्यवस्था असली, तरी स्वयंभू असलेल्या मंदिरांवर आधारित व्यवस्थेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मंदिराचा धार्मिक, आध्यात्मिक लाभ तर सहस्रो पटींनी होत असतोच; मात्र मंदिर स्वयंभूपणे त्याच्या क्षेत्राचा भौतिक विकास साध्य करून देते. अशा मंदिरांचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य आणि धर्मकार्य नव्हे का ?
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.