शासनाच्या वतीने कॉरिडॉर उभारणे
भाजप शासनाने हिंदूंचे प्राचीन तीर्थक्षेत्र काशी येथे ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर’, तर महाकाल शिवलिंगाच्या ठिकाणी ‘महाकाल कॉरिडॉर’ उभारला आहे. महाकाल कॉरिडॉरच्या ठिकाणी शासनाने भगवान शिवाशी संबंधित पौराणिक कथांचे देखावे उभारले आहेत. त्या देखाव्यांच्या ठिकाणी भगवान शिवाच्या अवतारांची, भक्तांची माहिती विविध कथांद्वारे दिली आहे. वेदांमधील मंत्र दिले आहेत. सप्तऋषींच्या मूर्ती उभारून त्यांची माहिती दिली आहे. याद्वारे शिवभक्ती जागवण्याचा शासनाने चांगला प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात पंढरपूर कॉरिडॉरचा विचार चालू आहे. शासनाने अधिकाधिक हिंदूंनी या तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात, त्यांना आध्यात्मिक लाभ व्हावा, हा हेतू ठेवून कॉरिडॉरचा विचार केल्यास ते हिंदूंना आध्यात्मिक आनंद मिळवून देणारे होईल. केवळ तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे किंवा अधिकाधिक लोकांनी भेट देऊन त्याद्वारे आर्थिक लाभाच्या दृष्टीने कॉरिडॉरचा विचार केल्यास हिंदू आध्यात्मिक लाभापासून वंचित रहातील. भाविक-भक्त यांना तीर्थक्षेत्री स्वच्छता, व्यवस्थित दर्शन आणि निवासाची सुविधा असावी अशा प्राथमिक अपेक्षा असतात. पर्यटनस्थळाचे स्वरूप आल्यास मौज करणे, खाणे-पिणे, छायाचित्रे काढणे, फिरणे यांकडे अधिक लक्ष जाईल. तसेच त्यामुळे संबंधित तीर्थक्षेत्राचे पावित्र्य अल्प होऊ शकते, तेथील सात्त्विकतेवर परिणाम होऊ शकतो.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद