सर्वांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यास वर्ष २०४७ मध्ये भारत विश्वगुरुपदी विराजमान होईल ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
पुणे, ५ मे (वार्ता.) – त्याग, सर्वस्व समर्पण म्हणजे हिंदु धर्म ! हिंदु धर्म अनादी काळापासून जोडण्याचे काम करत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना प्रत्येक भारतियाच्या कायम मनात आहे. सध्या सगळीकडे वाचन अल्प होत आहे. सर्वत्र ‘डिजिटलायझेशन’ झाले आहे, असे सांगितले जात आहे; परंतु ते चुकीचे आहे. आज ९० टक्के लोक ‘प्रिंट मिडिया’चा वापर करतात. सर्व भारतियांनी मिळून सनातन धर्माच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास वर्ष २०४७ मध्ये भारत विश्वगुरुपदी विराजमान होईल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव श्री. सुनील देवधर यांनी केले. ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्था’ संचलित मासिक ‘हिंदी विवेक’च्या वतीने ‘सनातन भारत’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ४ मे या दिवशी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या गणेश सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी प.पू. गोविंददेव गिरि महाराज मुख्य अतिथी होते. भाजपचे राष्ट्रीय सचिव श्री. सुनील देवधर, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे येथे उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला.
सनातन धर्मातील शंकानिरसन करणारे पुस्तक म्हणजे ‘सनातन भारत’ ! – स्वामी प.पू. गोविंददेव गिरि महाराज, श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष
सनातन धर्माच्या शंकांचे निरसन करणारे एकमेव पुस्तक म्हणजे ‘सनातन भारत’ ! सद्विचारांचा प्रसार करण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे. त्या माध्यमातून सनातन धर्माच्या कार्याविषयी माहिती मिळेल. ज्याप्रमाणे विज्ञानात प्रत्येक गोष्टीचे योगदान दिले आहे; परंतु विज्ञानाचा कुणी संस्थापक नाही, त्याप्रमाणे सनातन धर्मामध्ये ऋषिमुनींनी योगदान दिले आहे, त्यामुळे सनातन धर्माचा कुणी संस्थापक नाही.