अकोट फैल दंगलप्रकरणी ७० दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंद !
१० आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी !
अकोला – जिल्ह्यातील अकोट फैल येथे २ मेच्या रात्री पूर्ववैमनस्यातून २ गटांत दंगल उसळली होती. त्या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांची हानी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड चालू केली होती. यामध्ये पोलिसांनी १० आरोपींना अटक करून ३ मे या दिवशी न्यायालयात उपस्थित केले होते. न्यायालयाने ९ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर १ आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
झमझम स्टोअर्स आणि शंकरनगर परिसरात २ भागांतील काही तरुणांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दंगल उसळली. या दंगलीत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून कुंपणाच्या प्रवेशद्वार आणि संकुलातील घरांचे दरवाजे-खिडक्या यांना लक्ष्य करत घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी सर्व आरोपींवर दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेख रईस शे. राशीद, अजय राऊत, सो. खान अझर खान, दर्शन सूरज उजैनवाल, स्वप्नील वानखडे, विनोद पुंडगे, नागेश भगत, मो. शाकीर ए.राशीद, शे. साबीर शे. ताबीद अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सचिन बलखंडे हा सध्या पसार आहे. पोलिसांनी या आरोपींसह अन्य ६० ते ७० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.