सुविधांअभावी त्रास होऊन वडजी येथील महिलेची रस्त्यातच प्रसूती !
वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप !
वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – वैजापूर तालुक्यातील वडजी येथील महिला रिजवाना शाकीर पठाण या महिलेला ३० एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता प्रसूती कळा येत असल्याने लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले; मात्र वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात १२ घंट्यांनंतर साधारण प्रसूती होणार नसल्याचे सांगण्यात येऊन छत्रपती संभाजीनगर येथे खासगी वाहनाने पाठवण्यात येत असतांना तिची रस्त्यातच प्रसूती झाली. बाळ-बाळंतीण सुखरूप असले, तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणाविषयी नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे.
या रुग्णालयात १०८ च्या २ रुग्णवाहिका आहेत. खासगी वाहनात वैद्यकीय सुविधा नाहीत, तसेच वाहनासमवेत कर्मचारी अथवा परिचारिका पाठवली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला. गाडी निघाल्यानंतर २० मिनिटांतच त्रास चालू होऊन रस्त्यातच प्रसूती झाली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.