आजच्‍या भारतीय शिक्षणपद्धतीतून ७२ कलांचे शिक्षण समाप्‍त !  

१. नाभिराजाचे पुत्र ऋषभदेव यांच्‍याकडून जीवन जगण्‍यासाठी ७२ कलांच्‍या शिक्षणाची देणगी !

‘भारतीय साहित्‍याच्‍या इतिहासात असा उल्लेख सापडतो की, प्राचीन काळात नाभिराजाचे पुत्र ऋषभदेव पृथ्‍वीपती झाले होते. त्‍यांच्‍या पुरुषार्थामुळे जगामध्‍येे एक युगांतर झाले. त्‍या वेळेपर्यंत रानटी अवस्‍थेत रहाणार्‍या मनुष्‍यप्राण्‍याची गुहेेत राहून जंगलातील कंदमुळे, फळे-फुले खाऊन दांपत्‍य जीवन जगणे, हीच त्‍यांची नियती होती. ऋषभदेवानेच सर्वप्रथम खर्‍या अर्थाने सार्थक होईल, अशा जीवन जगण्‍याच्‍या शैलीत पालट केला. भूक मिटवण्‍यासाठी अन्‍न उत्‍पादन करण्‍यासाठी कृषीकलेचा आरंभ केला. प्रभु श्रीरामाचे पूर्वज श्री ऋषभदेवाने जगाला विशिष्‍ट उद्देशासह जीवन जगण्‍यासाठी ७२ कलांचे शिक्षण दिले.

प्रत्‍येक युगात आवश्‍यकतेनुसार त्‍या सर्व कलांचा वेळोवेळी विकास होत गेला. भारताच्‍या याच अलौकिक देणगीमुळे त्‍याला ‘जगद़्‌गुरु’ म्‍हणून गौरवले गेले. याच विशिष्‍ट कलांच्‍या माध्‍यमातून भारताने जगाला नवनवीन आविष्‍कार आणि संशोधन यांची साधने उपलब्‍ध करून देत मार्गदर्शनही केले. विविध क्षेत्रांमध्‍ये कलांचा विकास आणि शिक्षणाचा आधार हे भारतीय ज्ञानच आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या ४ पुरुषार्थांच्‍या शिक्षणाचा अभ्‍यासक्रम प्राचीन काळात सुनिश्‍चित करण्‍यात आला.

२. विद्यार्थ्‍यांना सर्वगुणसंपन्‍न करणारी प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धत !

ज्ञानवृद्धी आणि वृत्ती सदाचारी व्‍हावी, जीवनाची उपजीविका करतांना साहाय्‍य मिळावेे, तसेच पारलौकिक कल्‍याण साधले जावे, हा अभ्‍यासक्रमाचा उद्देश समजला जातो. आम्‍ही प्राचीन शिक्षणाचा अभ्‍यास करतो, तेव्‍हा असे आढळते की, शिक्षणाचा आदर्श किती उच्‍च गुणवत्तापूर्ण आणि व्‍यावहारिक होता. प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला सर्व विषयांचे संपूर्ण शिक्षण दिले जात होते. नृत्‍य, पाकविद्या, धनुर्वेद इत्‍यादी कलांचे शिक्षण गुरुकुलातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य अशा कोणत्‍याही वर्णातील विद्यार्थ्‍यांना मिळत होते.

३. मेकॉले शिक्षणपद्धतीने प्रभावित तथाकथित तज्ञांकडून अतीउच्‍च ज्ञानभांडाराचा र्‍हास !

आमची प्राचीन कला, आकाशातील उड्डाण, भारतीय ऋषी, महर्षी, ज्ञानी यांमध्‍ये एवढा शक्‍तीसंचय होता की, आज ते वाचून तोंडात बोट घालून आश्‍चर्यचकित होण्‍याविना आणखी काही शेष रहात नाही. अशा महान गोष्‍टींना मेकॉलेच्‍या शिक्षणपद्धतीने प्रभावित झालेले तथाकथित तज्ञ केवळ आख्‍यायिका आणि कपोलकल्‍पित घोषित करून अंधविश्‍वासाच्‍या कक्षेत आणून त्‍यांचा अंत करतात. आज पूर्वीच्‍या भारतीय क्षमतांना नाकारण्‍यात आले, तर ज्ञान असलेल्‍या ग्रंथांनाही कल्‍पना सागरात बुडवण्‍यात आले.

४. ‘यंत्र सर्वस्‍व ग्रंथ’ हा भारतातील ७२ कलांचा वारसा असलेल्‍या भारतीय संस्‍कृतीचे अनुपमेय रत्न !

पृथ्‍वी, जल आणि आकाश यांमध्‍ये पक्षीवेगाने उड्डाण करू शकतील, त्‍यालाच ‘विमान’ असे म्‍हटले गेले आहे. विविध ग्रंथांमध्‍ये करण्‍यात आलेले सूक्ष्म विश्‍लेषण आणि व्‍याख्‍या यांच्‍या चिंतनाच्‍या परिणामावरून हे स्‍पष्‍ट होते की, आमचे पूर्वज आकाशात उड्डाण करण्‍याच्‍या कलेमध्‍ये अत्‍यंत निपुण होते. प्राचीन भारतियांच्‍या या कला-निपुणतेला सध्‍याचे आधुनिक वैज्ञानिक समजून घेऊ शकले नाहीत आणि ते कल्‍पनेची तेवढी भरारीही घेऊ शकले नाहीत. विमान कलेमधील रहस्‍यांचा शोध लावण्‍यात आधुनिक शास्‍त्रज्ञ व्‍यस्‍त आहेत; मात्र ते ज्ञान भारतीय पूर्वज आधीपासूनच जाणत होते. या सत्‍याची प्रचीती असलेला ‘यंत्र सर्वस्‍व ग्रंथ’ हा होय. भारतियांकडे ‘दूरदर्शक यंत्र’ होते, ज्‍याला शास्‍त्रज्ञांनी ‘दुर्बिण’ असे नाव दिले आहे. ग्रंथाच्‍या २८ व्‍या रहस्‍यामध्‍ये सध्‍याच्‍या शास्‍त्रज्ञांप्रमाणे दूर अंतरावरूनच शत्रूच्‍या प्रत्‍येक विमानाचा ठावठिकाणा लागू शकतो, अशी क्षमताही होती.

या ग्रंथात उल्लेख केलेले ज्ञान हे भारतीय कलाप्रतिभेेचे अमूल्‍य भांडार आहे. सांगायचे तात्‍पर्य असे की, उत्तम शिक्षणव्‍यवस्‍था राबवली गेली, तरच या ग्रंथातील ज्ञानार्जन करून भारतियांना त्‍यांच्‍या क्षमतांचा विकास साधणे शक्‍य होऊ शकतेे. अशाच प्रकारे मूर्तीकला, नौकानिर्माण, अस्‍त्र-शस्‍त्र निपुणता, गंधर्व विद्या, नाट्यकला, लेखनकला, चिकित्‍सा, व्‍यायाम, रत्नविद्या, ज्‍योतिर्विज्ञान, सांख्‍यदर्शन, न्‍यायदर्शन या सर्वांसहित भारतातील ७२ कलांचा वारसा असलेल्‍या भारतीय संस्‍कृतीचे हे अनुपमेय रत्न आहे.’

– डॉ. रावल जैन, गांधीवादी विचारवंत

(साभार :  त्रैमासिक ‘दाल-रोटी’ जानेवारी ते मार्च २०१६)