‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ हा ग्रंथ वाचतांना सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांना झालेला लाभ आणि जाणवलेली सूत्रे !
वैशाख पौर्णिमा (५.५.२०२३) या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘कल्याण येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे उच्च कोटीचे संत होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही त्यांची महती सांगितली आहे. ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ हा ग्रंथ वाचतांना मला योगतज्ञ प.पू. दादाजींचे चैतन्य मिळते आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने प्रतिदिन साधना, कर्म, भक्ती आणि भाव यांविषयी मार्गदर्शन होते. त्यामुळे मला साधना करण्यास प्रेरणा मिळते. हा ग्रंथ वाचतांना मला झालेले लाभ आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ या ग्रंथातील सुवचने व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत’, असे लक्षात येणे
‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर मी तो वाचला; पण त्याविषयी मी गांभीर्याने चिंतन आणि मनन न केल्याने त्यातील मार्गदर्शन मला कृतीत आणता येत नव्हते; म्हणून मी हा ग्रंथ पुन्हा वाचण्यास आरंभ केला. तेव्हा या ग्रंथात ‘योगतज्ञ दादाजींनी सांगितलेली सुवचने व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
२. ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ या ग्रंथातील सुवचने इतरांना पाठवतांना झालेला लाभ !
२ अ. ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची काही सुवचने प्रतिदिन ‘व्हॉट्सअॅप’वरून अनेकांना पाठवणे आणि त्यातून योगतज्ञ प.पू. दादाजी समष्टी साधना करून घेत आहेत’, असे वाटणे : मी योगतज्ञ दादाजी यांचे छायाचित्र आणि त्यांचे एक सुवचन यांची एक ‘पोस्ट’ सिद्ध करून काही साधकांना ‘व्हॉट्सअॅप’वर पाठवली. ते सुविचार त्यांना पुष्कळ भावले. त्यानंतर मी एक दिवसा आड योगतज्ञ प.पू. दादाजींच्या सुवचनांचा लघुसंदेश ‘व्हॉट्सअॅप’च्या ‘स्टेटस्’वर ठेवू लागलो. ते पाहून आणखी काही साधक आणि समाजातील जिज्ञासू यांनी मला ‘आम्हालाही हा ‘व्हॉट्सअॅप’ संदेश पाठवा’, असे सांगितले. त्यानुसार मागील वर्षभर मी प्रतिदिन सकाळी योगतज्ञ प.पू. दादाजींच्या सुवचनांचे संदेश ‘व्हॉट्सअॅप’वर पाठवत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवल्यानुसार ‘अध्यात्म आणि साधना यांविषयी आपल्याला जे शिकायला मिळते, ते इतरांनाही शिकवणे, ही समष्टी साधना आहे.’ त्यानुसार ‘योगतज्ञ दादाजी त्यांची अमृतमय सुवचने माझ्याकडून काही जिज्ञासूंना पाठवून माझी समष्टी साधना करून घेत आहेत’, असे मला वाटते.
२ आ. सुवचनांचा अभ्यास करून ‘व्हॉट्सअॅप’ संदेश सिद्ध करतांना त्याचा स्वयंसूचना घेतल्याप्रमाणे मनावर संस्कार होऊन तशी कृती होणे : सुवचनांचा अभ्यास करून ‘व्हॉट्सअॅप’ संदेश सिद्ध करतांना आणि तो इतरांना पाठवतांना माझ्या मनावर त्याचा स्वयंसूचना घेतल्याप्रमाणे संस्कार होतो. त्यामुळे दिवसभर मला त्याची आठवण रहाते. योगतज्ञ दादाजी माझ्याकडून त्या सुवचनाप्रमाणे कृतीच्या स्तरावर प्रयत्न करवून घेतात. केवळ ‘योगतज्ञ प.पू. दादाजींचे चैतन्य आणि गुरुकृपा यांमुळे हे होते’, असे मला जाणवते.
३. योगतज्ञ प.पू. दादाजी यांची अमृतमय सुवचने !
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे. त्यांनी गुरुकृपायोगामध्ये अष्टांग साधना करायला सांगितली आहे. या अष्टांगातील प्रत्येक अंगाशी संबंधित सुवचने योगतज्ञ दादाजींच्या ग्रंथात शिकायला मिळतात. त्यातील प्रातिनिधिक स्वरूपाची उदाहरणे येथे देत आहे.
३ अ १. स्वभावदोष निर्मूलन : ‘स्वतःमधील स्वभावदोष दूर करणे’, म्हणजेच स्वतःला पालटणे. असे केल्याने ईश्वरप्राप्ती दूर नाही.
३ अ २. अहं निर्मूलन : द्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच !
३ अ ३. नामजप : ‘नामस्मरण’ हे या भवसागरातून पार पडण्याचे साधन आहे. नित्य हरिचरणांचे स्मरण करावे. त्यामुळे देहरोग आणि भवरोग (विषयांची आसक्ती ) दोन्ही दूर होतात.
३ अ ४. सत्संग : ‘व्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे ?’, यावरून तिची ओळख ठरते; म्हणूनच ‘आपल्याभोवती सात्त्विक वृत्तीच्या लोकांचा वावर असेल’, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी.
३ अ ५. सत्सेवा : फळाची अपेक्षा न ठेवता नेहमी सत्कर्मे करत रहावीत.
३ अ ६. भावजागृती : ‘जे होईल, ते माझ्या हिताचेच होईल. परमेश्वर किंवा गुरु माझ्यासाठी कल्याणप्रद असेच करतील’, अशी दृढ श्रद्धा हवी. शिष्याने गुरूंवर निर्विकल्प निष्ठा ठेवावी.
३ अ ७. सत्साठी त्याग : वर्तमानकाळ अणि भविष्यकाळ यांविषयी भीती दाखवणारी संकटे अन् त्यामुळे घडणारा अनर्थ टाळण्यासाठी तुम्ही परमेश्वराला सर्वस्व देऊन टाका. कसलीही मागणी न करता अन् काहीही राखून न ठेवता हे करा, म्हणजे तुमच्यातील सर्वकाही ईश्वराचे होईल.
३ अ ८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम) : इतरांच्या वर्तनाचा विचार न करता आपले वर्तन सदैव चांगले ठेवा !
आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी माझ्यासारख्या अनेक साधकांना अमृतमय बोधामृत पाजणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आणि त्यानुसार माझ्याकडून कृती करवून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी शरणागत भावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.४.२०२३)