पुढील दोन वर्षांत देवरुखवासियांना होणार २४ घंटे पाणीपुरवठा
देवरुख – शहराची होत असलेली वाढ आणि नागरिकांची पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरासाठी २४ घंटे पाणीपुरवठा करणारी नवीन पाणीपुरवठा योजना सिद्ध करण्यात आली आहे. ही योजना करतांना पुढील ३० वर्षांचा देवरुख शहराचा विस्तार आणि पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन डी.पी.आर्. (सविस्तर प्रकल्प अहवाल) सिद्ध करण्यात आला आहे. या अहवालाचे सादरीकरण शहरातील नागरिकांसाठी करण्यात आले होते. या वेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कदम, पाणीपुरवठा सभापती रेश्मा किर्वे, युयुत्सु आर्ते, सुशांत मुळ्ये, नगरसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी या पाणी योजनेची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच नागरिकांच्या सूचनाही लक्षात घेऊन सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये आवश्यकतेनुसार पालट करण्यात येणार आहेत. ही नवीन पाणीपुरवठा योजना ५३ कोटी रुपयांची आहे. पुढील ३० वर्षांचा विचार करता बावनदी – वांझोळे येथे नवीन धरण बांधण्यात येणार आहे. सध्या धावडेवाडी आणि पर्शरामवाडी येथून पाणी पुरवठा केला जात आहे. नवीन जलवाहिनी, काही ठिकाणी नवीन टाक्यांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी ८ विभाग तयार करण्यात आले आहेत. पठारवाडी आणि कोल्हेवाडी येथे स्वतंत्र टाकीत पंपिंगद्वारा पाणी सोडले जाणार आहे. या योजनेचे काम ॲक्वाकॉन आस्थापनाला देण्यात आले आहे.
या योजनेची माहिती शाम बडावणे यांनी दिली. पर्शरामवाडी ‘जॅकवेल’ची दुरुस्ती करून नवीन ‘जॅकवेल’ची उभारणी होणार आहे. कावळटेक येथे पाणी फिल्टरचे नवीन बांधकाम होणार आहे. नळधारकांसाठी ४ इंची पाईप वापरण्यात येणार आहे.