६ मे या दिवशी तेलशुद्धीकरण प्रकल्प होण्यासाठी युतीचा मोर्चा : उद्धव ठाकरे आंदोलकांना भेटण्यासाठी बारसूत येणार

बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरणाचे राजकारण !

उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे जाणार असल्याची घोषणा केली

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सूत्रावरून राजकारण तापत आहे. या सूत्रावरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे ६ मे या दिवशी बारसूत येत आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या दिवशी तेलशुद्धीकरण प्रकल्प होण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, तर दुसरीकडे या प्रकल्पाला समर्थन करणारेही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची प्रकल्पाविषयी संमतीपत्रे देणार आहेत.

१ मे या दिवशी मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे जाणार असल्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी दौर्‍याच्या दिवशीच भाजप-शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार हे प्रकल्पाच्या समर्थनात निघाणार्‍या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. कोकणाच्या विकासासाठी, रोजगारासाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी मांडली आहे.

या प्रकल्पासाठी बारसू येथे माती सर्वेक्षणाचे काम चालू करण्यात आले होते. त्यामुळे या सर्वेक्षणाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन चालू केले होते. या आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ६ मे रोजी बारसू येथे येत आहेत. या वेळी या प्रकल्पाला राजापूर तालुक्यात असलेले समर्थन ठाकरे यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी काही प्रकल्प समर्थकही ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यामध्ये विविध ५१ संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, भूमीमालक, बागायतदार, व्यापारी असे सहस्रो समर्थक आहेत.