जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची नियुक्ती

व्यावसायिक अजय बंगा

नवी देहली – भारतीय वंशाचे व्यावसायिक आणि अमेरिकेचे नागरिक अजय बंगा (वय ६३ वर्षे) यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर पोचणारे ते पहिले भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत. ते २ जून या दिवशी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे अजय बंगा यांचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. अंजय बंगा यांनी देहलीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. पुढे त्यांनी आय.आय.एम्. अहमदाबादमधून एम्.बी.ए. केले. अजय बंगा यांनी नेस्ले, सिटी ग्रुप, मास्टरकार्ड यांसारख्या आस्थापनांमध्ये काम केले आहे. वर्ष २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेचे नेतृत्व करण्यासाठी बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती. या पदासाठी दावेदारी करणारे एकमेव नामांकन केवळ बंगा यांच्याकडून प्रविष्ट झाले होते.