जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात चकमक : काही जण घायाळ
नवी देहली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात भारतीय कुस्तीपटू येथील जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण यांनी काही महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ३ मेच्या रात्री कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात चकमक उडाली. त्या वेळी काही कुस्तीपटू घायाळ झाले. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कुस्तीपटू म्हणाले की, हाच दिवस पहाण्यासाठी आम्ही देशासाठी पदक जिंकले होते का ? आम्ही आमची सर्व पदके सरकारला परत करू.
#WATCH | Delhi: A scuffle breaks out between protesting wrestlers and Delhi Police at Jantar Mantar pic.twitter.com/gzPJiPYuUU
— ANI (@ANI) May 3, 2023
रात्री पावणे अकराच्या सुमारास पावसामुळे अंथरूण आणि रस्ते ओले झाल्यामुळे कुस्तीपटू पलंग घेऊन तेथे पोचले. आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती हेही पलंग घेऊन पोचले. पोलिसांनी त्यांना रोखले असता वाद चालू झाला. पोलिसांनी सांगितले, ‘आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.’ या वेळी कुस्तीपटू संतापले आणि किरकोळ झटापट झाली. भारती यांच्यासह अनेकांना कह्यात घेण्यात आले. कुस्तीपटूंनी आरोप केला की, पोलिसांनी अचानक आमच्यावर आक्रमण केले. अनेक पोलिस मद्यधुंद स्थितीत होते. त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली.