त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत मार्गावर दरड कोसळून एका भाविकाचा मृत्यू !
नाशिक – त्र्यंबकेश्वर शहराला अभेद्य असा आधार लाभलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरून दरड कोसळल्याने दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २ मे या दिवशी ब्रह्मगिरी पर्वतावरून दर्शन घेऊन खाली उतरत असतांना घडली. भानुदास आरडे असे त्या भाविकाचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील हरळी लिमगाव येथील रहिवासी आहे. आरडे हे कुटुंबियांसह त्र्यंबकेश्वर देवदर्शनासाठी आले होते. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी ब्रह्मगिरीवर गेले होते. आरडे यांच्या अंगावर ३-४ दगड पडल्याने हात-पाय आणि डोके यांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात् मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.