महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी मोठे कार्य केले ! – बाबा भांड
मिरज येथे वसंत व्याख्यानमालेस प्रारंभ !
मिरज, ३ मे (वार्ता.) – नाशिक जिल्ह्यातील एका खेड्यातील मुलगा बडोदा संस्थानात दत्तक जातो आणि राजा होऊन डोळे दीपवणारी समाजाची कामे करतो. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दलित वर्गासाठी केलेले कार्य कालातीत आहे, असे प्रतिपादन लेखक-प्रकाशक बाबा भांड यांनी केले. ‘मिरज विद्यार्थी संघा’च्या वसंत व्याख्यानमालेच्या उद़्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘खरे वाचन मंदिरा’चे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाठक होते.
आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ. पाठक यांनी संस्थेच्या १०४ वर्षांच्या वाटचालीचा गौरवपूर्व उल्लेख करून या वाटचालीत वसंतराव आगाशे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. या व्याख्यानमालेस वर्ष १९२५ प्रारंभ झाला आणि हे ९८ वे वर्ष होते, असे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे कार्यवाह विष्णु सदाशिव तुळपुळे यांनी करून दिला. या वेळी पर्यावरणरक्षणासाठी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बिजारोहण करून १ सहस्र वृक्ष सिद्ध करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. या वेळी आभारप्रदर्शन मिरज येथील डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.