सुकिवली (खेड) येथील आरोपी सूर्यकांत चव्हाण याला फाशीची शिक्षा
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे प्रकरण
रत्नागिरी – ५ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुकिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणी सूर्यकांत नवनाथ चव्हाण या आरोपीला खेड जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
सुकिवली गावातील चव्हाणवाडी येथे १९ जुलै २०१८ या दिवशी एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. त्यानंतर शौचालयाच्या टाकीमध्ये तिचा मृतदेह लपवण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी मुलीचा नातलग असलेला सुकिवली येथील सूर्यकांत चव्हाण याला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंद केला होता. बुधवारी, ३ मे २०२३ या दिवशी या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एल. निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
Ratnagiri: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत खून; आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षाhttps://t.co/AO16MfsNRa
— My Mahanagar (@mymahanagar) May 3, 2023
शासकीय अधिवक्ता पुष्पराज शेट्ये यांचा सत्कार !
या प्रकरणात शासकीय अधिवक्ता पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आणि सबळ पुरावे तपासून आरोपी चव्हाण याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी अधिवक्ता पुष्पराज शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, तर सुकिवली गावकर्यांनीही अधिवक्ता पुष्पराज शेट्ये यांचा सत्कार करून गौरव केला.