कोकणासाठी आणखी २६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
रेल्वे प्रशासनाचा निर्णय !
रत्नागिरी – उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्यानंतर गावाकडे अनेक प्रवासी येत असतात. त्यामुळे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी २६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोवा राज्यातील थिवी दरम्यान या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेने आतापर्यंत ९१६ उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली होती. त्यात आता २६ गाड्यांची भर पडल्याने ही संख्या ९४२ झाली आहे.
नव्याने घोषित करण्यात आलेल्या २६ उन्हाळी विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
०११२९ विशेष – ६ मे २०२३ ते ३ जून २०२३ पर्यंत प्रति शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि थिवी येथे दुसर्या दिवशी ११.३० वाजता पोचेल.
०११३० विशेष – ७ मे २०२३ ते ४ जून २०२३ पर्यंत प्रति रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिवी येथून दुपारी १६.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोचेल. या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबणार आहेत.
या विशेष गाड्यांचे आरक्षण ४ मे २०२३ या दिवशी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर चालू होईल.