‘एन्.सी.बी.’ची हणजूण (गोवा) येथील अमली पदार्थ निर्मितीच्या प्रयोगशाळेवर कारवाई

‘एन्.सी.बी.’ने गोव्यातील अमली पदार्थांच्या विरोधात आठवड्याभरात दुसरी मोठी कारवाई केली

पणजी, २ मे (वार्ता.) – ‘नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (‘एन्.सी.बी.’ने) गोव्यातील अमली पदार्थांच्या विरोधात आठवड्याभरात दुसरी मोठी कारवाई केली आहे. ‘एन्.सी.बी.’ने हणजूण येथे गुप्तपणे कार्यरत असलेल्या ‘एल्.एस्.डी.’ या अमली पदार्थांची निर्मिती करणार्‍या प्रयोगशाळेवर कारवाई केली. या कारवाईत विविध प्रकारचे सुमारे २५ लाख १७ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणी मुख्य सूत्रधार तथा बंगालचा रहिवासी ए. कुंडू याला कह्यात घेतले आहे. कारवाईमध्ये ३२ सहस्र रुपये रोख रक्कम, १८ ‘यू.एस्.डी.’ चलन आणि श्रीलंकेच्या चलनाच्या रूपात ३८ सहस्र २१० रुपये किमतीएवढी रोख रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. ‘एन्.सी.बी.’च्या या कारवाईमुळे गोवा हे अमली पदार्थांच्या व्यवहाराचे एक केंद्र बनण्याबरोबरच अमली पदार्थ निर्मितीचे केंद्रही बनल्याचे सिद्ध होत आहे.

‘एन्.सी.बी.’ने गत आठवड्यात मांद्रे येथे छापा टाकून अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्या रशियाच्या ऑलिंपिंकपटू आणि रशियाचे माजी पोलीस अधिकारी यांना कह्यात घेतले होते. या कारवाईत आकाश नावाच्या एका स्थानिकाला कह्यात घेण्यात आले होते. आकाशकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘एन्.सी.बी.’ने अमली पदार्थांच्या प्रयोगशाळेवर कारवाई केली आहे.

(सौजन्य : Prudent Media Goa)  

गोव्यातील पोलीस यंत्रणेची धावपळ

अमली पदार्थ निर्मितीसाठीचा कच्चा माल गोव्यात येऊन ‘एल्.एस्.डी.’सारख्या महागड्या अमली पदार्थाची गोव्यात निर्मिती होत असल्याचे समजल्यावर गोव्यातील पोलीस यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली आहे. ‘एन्.सी.बी.’ने गत आठवड्यात गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराचे आंतरराष्ट्रीय रॅकेट (साखळी) उघडकीस आणल्यानंतर जिल्हा पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग आणि अमली पदार्थविरोधी पथक यांनी अमली पदार्थांच्या विरोधात मोहीम आरंभली होती. ‘एन्.सी.बी.’च्या छाप्यानंतर गोवा पोलिसांनी ४ प्रकरणांत गुन्हा नोंदवून एकूण सुमारे २५ लाखांहून अधिक किमतीचा अमली पदार्थ कह्यात घेतला होता.

संपादकीय भूमिका

‘नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या लक्षात येते, ते लक्षात न येणारे गोवा पोलीस !