प्रखर स्वराष्ट्राभिमान, लढवय्ये आणि साम्राज्य संस्थापक थोरले बाजीराव पेशवे !
आज ३ मे २०२३ या दिवशी असलेल्या थोरले बाजीराव पेशवे स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
‘वैशाख शुक्ल त्रयोदशी या दिवशी नर्मदातीरी रावेरखेडी येथे थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन झाले. बाळाजी विश्वनाथांपासून माधवरावांपर्यंत मराठी राज्यांचे जे संवर्धन झाले, त्यात थोरल्या बाजीरावांची योग्यता अधिक आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकीर्दीत सैनिकांपासून राजकारणापर्यंत शर्थ केली. त्यांनी निजामासारख्या सामर्थ्यवान प्रतिस्पर्ध्याला दमास आणून गिरिधर बहाद्दर, महंमद बंगश, सरबुलंदखान अशा बादशाही विरांनाही नामोहरम केले. एकेकाळचे मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी त्यांच्या ‘Oriental Experiences’ पुस्तकामध्ये बाजीरावांसंबंधी लिहिले आहे, ‘निरनिराळे सरदार एकमेकांशी विरोध करत असतांना त्यांच्यात ऐक्य निर्माण करणे, मुसलमानांच्या कह्यातील प्रदेश सोडवणे आणि हिंदूंचे संघटन करणे, ही महत्त्वाची कामे बाजीरावाला सिद्धीस न्यायची होती. शारीरिक स्वरूपाने भव्य आणि रूबाबदार, वर्तनाने प्रेमळ, भाषणाने आकर्षक, बुद्धीने कल्पक अन् तरतरीत, तसेच संकटांत युक्तीबाज असल्यामुळे त्याला लगोलग यश मिळत गेले. कोणत्याही युद्धसंग्रामांत तो सर्वांपुढे निर्भयपणे ठासून उभा रहात असे. सभोवार बंदुकीच्या गोळ्यांचा मारा होत असता तो कधीच कचरला नाही. त्याचा स्वराष्ट्राभिमान प्रखर असून त्यापुढे कोणतीही अडचण तो जुमानत नसे. त्याचा सारा जन्म उन्हातान्हांत गेला. तसाच मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात झाला. ‘लढवय्या पेशवा’ म्हणून त्यांची कीर्ती आजही देशभर आहे.’
बाजीरावांचे प्राणोत्क्रमण ज्या जागी झाले, तेथे वृंदावनरूपात एक छत्री उभारली आहे. इंदूर-खांडवा रेल्वेलाईनवर रावेरखेडी सनावद स्टेशनपासून १५ मैलांवर (२४ किलोमीटरवर) त्यांची समाधी आहे. नदीमध्ये बाजीरावांची दहनभूमी आहे. तेथेच एक ओटा बांधून त्यावर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. जवळच श्रीमंतांचा वियोग असह्य होऊन प्राणत्याग केलेल्या त्यांचा एक हत्ती आणि घोडा यांची दोन थडगी आहेत.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))