स्वच्छतागृह ठेकेदारांची ‘दादागिरी’ का ?
राज्यातील महिलांच्या सन्मानार्थ एस्.टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. त्यामुळे बसस्थानकांवर महिलांची वर्दळ वाढली आहे; मात्र या परिस्थितीचा अपलाभ काही ठिकाणी घेतला जात आहे. सातारा बसस्थानकातील स्वच्छतागृह ठेकेदार अत्यंत मनमानी कारभार करत आहेत. महिलांसाठी स्वच्छतागृहासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा नियम असूनही तो धाब्यावर बसवून महिला प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. विशेष म्हणजे गत अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू असून एस्.टी. प्रशासनाकडून याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ठेकेदाराची ‘दादागिरी’ अजूनही चालूच आहे, हे गंभीर आणि संतापजनक आहे.
सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्राचा केंद्रबिंदू समजला जातो. यामुळे सातारा येथून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आदी ठिकाणी एस्.टी. बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असते. आता तर महिला प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एस्.टी. महामंडळाची इमारत अपुरी पडत आहे आणि प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधांकडेही एस्.टी. प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. बसस्थानक परिसरात शीतपेयांच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आदी कचरा तसाच पडून असतो. स्वच्छता ठेकेदार हा कचरा दिवसेन्दिवस उचलत नाहीत; मात्र एस्.टी. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते कि काय ? असा प्रश्न निर्माण होतो. त्यातच भर म्हणून प्रवाशांच्या सोयीचा अपलाभ घेत स्वच्छतागृह ठेकेदार मनमानी कारभार करून प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. स्वच्छतागृहात प्रतिव्यक्ती शौचालयासाठी ५ रुपये, तर स्नानगृहासाठी ७ रुपये आकारले जातात. महिलांसाठी ही सुविधा विनामूल्य असल्याचा फलक बसस्थानक परिसरात लावण्यात आला आहे; मात्र तरीही स्वच्छतागृहात काम करणारी महिला कर्मचारी महिलांकडून पैसे घेते.
एका बाजूला राज्य सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असून दुसर्या बाजूला खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून महिला प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्यामुळे महिलांमध्ये तीव्र असंतोषाची लाट पसरली आहे. त्यामुळे सातारा एस्.टी. प्रशासनाने याची गंभीर नोंद घेऊन स्वच्छतागृहाच्या माध्यमातून महिला प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट त्वरित थांबवावी, ही अपेक्षा !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा