नवीन पिढीपर्यंत धर्माचरणाचे महत्त्व पोचवणे, ही काळानुसार साधना ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
हिंदु जनजागृती समितीचे भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान !’
भोपाळ – आज आपण केवळ जातीच्या प्रमाणपत्रावर लिहिले आहे; म्हणून हिंदु आहोत ? कि धर्माचे आचरण करतो म्हणून हिंदु आहोत ? धर्माचरण करणे आणि नवीन पिढीपर्यंत धर्माचरणाचे महत्त्व पोचवणे, ही काळानुसार महत्त्वाची साधना आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. मीनल रेसिडेन्सी येथे जिज्ञासू आणि धर्माभिमानी यांच्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करत होते.
सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘आज हिंदूंच्या रक्षणासाठी विविध संघटना कार्य करत आहेत; पण हिंदुत्व, हिंदु धर्म आणि हिंदूंच्या श्रद्धा यांच्या रक्षणासाठी हिंदूंकडे काय योजना आहेत ? हिंदु म्हणजे काय ? आपले सण आणि उत्सव यांचे शास्त्र काय आहे ? अशा धर्माविषयी मूलभूत गोष्टी हिंदूंना ठाऊक नसतील, तर सनातन धर्माचे रक्षण कसे होईल ? यासाठी आपण धर्म जाणून घेऊन आचरण करणे आणि त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे.’’