स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित करा ! – जितेंद्र वाडेकर, विहिंप

सातारा येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

आंदोलनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

सातारा, २ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यापासून आतापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी निर्माण केली गेलेली खोटी प्रतिमा नष्ट व्हावी आणि त्यांचा राष्ट्रकार्याचा इतिहास भावी पिढीला शिकवला जावा, यासाठी शालेय अभ्यासक्रमात सावरकर यांच्या संदर्भात सखोल इतिहास शिकवणे आवश्यक आहे. गत काही दिवसांपासून सावरकरांची निंदानालस्ती करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम काँग्रेसकडून चालू आहे. यामुळे झालेली हानी भरून काढता येणार नाही; परंतु त्यांना मोठा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान तरी निश्चित वाढवता येईल. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित करावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे माजी शहरमंत्री जितेंद्र वाडेकर यांनी केली.

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, अनिकेत कदम, रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक, अधिवक्ता धनंजय चव्हाण आणि ३५ हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी आंदोलनाला संबोधित करतांना सौ. रूपा महाडिक यांनी ‘श्रीरामनवमीच्या निमित्ताने देशभरात निघालेल्या शोभायात्रा-मिरवणुका यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली. ‘पाकिस्तान येथील अल्पसंख्यांक हिंदूंवर अमानुष अत्याचार चालू असून त्यांच्या रक्षणार्थ भारत सरकारने गंभीर पावले उचलावीत’, अशी मागणी समितीचे हेमंत सोनवणे यांनी केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे अनिकेत कदम यांनीही आंदोलनाला संबोधित केले.