नातेवाइकांशी प्रेमाने वागून त्यांची मने जिंकणारे आणि सेवाभावी वृत्तीचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. भानु पुराणिक !
‘श्री. भानु पुराणिक यांच्यासारखे साधक सनातन संस्थेला लाभणे, ही ईश्वरी कृपाच आहे. ‘त्यांची साधनेतील पुढील प्रगती जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२३) |
वैशाख शुक्ल त्रयोदशी (३.५.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. भानु पुराणिक यांचा ४५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. आरती पुराणिक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. भानु पुराणिक यांना ४५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. प्राप्त परिस्थितीत आणि उपलब्ध वेळेत सर्व सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
‘श्री. भानु परिस्थितीला कधीच दोष देत नाहीत. त्यांच्याकडे संतांची सेवा असल्याने त्यांना सतत वर्तमानकाळात रहावे लागते. त्यांना सेवेची कितीही तातडी असली, तरी त्यांच्या आईने त्यांच्याकडे काही मागितल्यास किंवा माझ्या आई-बाबांनी एखादे काम सांगितल्यास ते कधीच नकार देत नाहीत. त्याच वेळी सहसाधकांनी साहाय्य मागितल्यास त्यांनाही ते कधी नकार देत नाहीत. ‘प्राप्त परिस्थितीत आणि उपलब्ध वेळेत सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो’, यासाठी त्यांचे प्रयत्न सतत चालू असतात. आश्चर्य म्हणजे, त्यांचे नियोजन इतके परिपूर्ण असते की, त्यांनी एखादी सेवा करायला घेतल्यावर सर्व सेवा आणि त्यांची वैयक्तिक कामेही वेळेत झालेली असतात.
२. परिस्थिती स्वीकारणे
श्री. भानु यांच्या भाच्याचे लग्न ठरले होते. तेव्हा त्यांना लग्नाला जायचे होते; परंतु त्या वेळी त्यांच्याकडे एक तातडीची सेवा आल्याने त्यांनी लग्नाला न जाता सेवेला प्राधान्य दिले. ही परिस्थिती त्यांनी सहजतेने स्वीकारली. असे प्रसंग आतापर्यंत अनेक वेळा आले आहेत, तरी त्यांनी त्याबद्दल कधी तक्रार केली नाही.
३. सर्वांशी प्रेमाने वागून सासुरवाडीच्या नातेवाइकांचीही मने जिंकणे
माझे आई-बाबा आश्रमाजवळच रहात असल्याने आमचे अनेकदा त्यांच्या घरी येणे-जाणे असते. आमच्या लग्नाला २० वर्षे झाली, तरी श्री. भानु यांनी आतापर्यंत एकदाही माझ्या घरच्यांविषयी किंवा माझ्या नातेवाइकांविषयी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. याचे मला पुष्कळ नवल वाटते. माझ्या माहेरचे रहाणीमान त्यांच्या घरातील रहाणीमानापेक्षा पुष्कळ भिन्न असूनही ते माझ्या माहेरी सर्वांमध्ये समरस होतात. त्यांनी आतापर्यंत कधीच ‘जावई म्हणून मान मिळावा’, अशी अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या माहेरच्या नातेवाइकांचीही मने जिंकली आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमधून मला पुष्कळ शिकता आले आणि माझ्या सासरच्या मंडळींशी जुळवून घेणे, मला सोपे झाले.
४. नातेवाइकांशी भावनाशील न रहाता तत्त्वनिष्ठ रहाणे
माझी नणंद (श्री. भानु यांची मोठी बहीण) या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार धर्मप्रचाराची सेवा करतात. कधी त्यांना कार्याच्या स्तरावर अथवा मनाच्या स्तरावर काही अडचण आल्यास श्री. भानु त्यांना मानसिक स्तरावर हाताळत नाहीत किंवा त्यांना विनाकारण साधनेचे दृष्टीकोन देत नाहीत. ते ताईंना त्यांच्या उत्तरदायी साधकाशी बोलून घेण्यास सांगतात किंवा त्यावर योग्य स्वयंसूचना घेण्यास सांगतात.
५. पत्नीला स्वतःचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे आणि एखाद्या कृतीचा तिच्या साधनेवर विपरीत परिणाम होत असेल, तर तिला तिची चूक लक्षात आणून देणे
मागील अनेक वर्षे सासरी किंवा माहेरी झालेल्या कार्यक्रमांसाठी उपस्थित रहाण्यापेक्षा ते सेवा आणि साधना यांनाच प्राधान्य देतात, यामध्ये ते मला माझा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. मी जोपर्यंत त्यांना स्वतःहून विचारत नाही, तोपर्यंत ते मला कधीच त्यांचे मत सांगत नाहीत; पण सेवेअंतर्गत माझे चुकत असेल किंवा माझ्या एखाद्या कृतीचा माझ्या साधनेवर विपरीत परिणाम होत असेल, तर ते मला माझी चूक लक्षात आणून देतात आणि प्रसंगी कठोर भूमिकाही घेतात.
६. रुग्णाईत साधकांची काळजी घेण्याचे कौशल्य असणे
त्यांच्याकडे रुग्णाईत साधकांची काळजी घेण्याचे विशेष कौशल्य आहे. रुग्णाईत साधकाला ‘हवे-नको ते पहाणे, त्याला जेवण जात नसल्यास काहीतरी वेगळे बनवून घेऊन खायला देणे, त्याला वेळेवर औषधे देणे, जेवण देणे, त्याची खोली आवरून ठेवणे इत्यादी सेवा ते तत्परतेने आणि मनापासून करतात. त्यामुळे रुग्णाईत साधकाला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
७. सेवाभावी वृत्ती
७ अ. रात्री झोपायला कितीही विलंब झाला, तरी दुसर्या दिवशी ठरलेल्या वेळी उठून सेवला जाणे : त्यांच्याकडे संतांची सेवा आहे. त्यासाठी त्यांना प्रतिदिन सकाळी ६.३० वाजता जायचे असते. श्री. भानु यांनी मागील २ वर्षांत यात कधीच खंड पडू दिला नाही. रात्री झोपायला कितीही विलंब झाला, तरी दुसर्या दिवशी ठरलेल्या वेळी उठून ते सेवेला जातात, तसेच रात्री झोपायला विलंब झाला; म्हणून ते सेवा झाल्यावर कधी झोपत नाहीत.
७ आ. पाय आणि अंग पुष्कळ दुखत असूनही दुसर्या दिवशी नेहेमीच्या वेळेत उठून सेवेला जाणे आणि देवाला प्रार्थना केल्यामुळे देवाचे साहाय्य मिळून परिस्थितीवर मात करता येणे : एकदा त्यांचे पाय आणि अंग पुष्कळ दुखत असल्याने ते सायंकाळी थोडा वेळ झोपले. त्यांची स्थिती पाहिल्यावर ‘त्यांना दुसर्या दिवशीही पूर्ण दिवस झोपून रहावे लागेल’, असे मला वाटले होते; पण थोड्या वेळाने उठून ते सेवेला गेले. दुसर्या दिवशीही ते नेहमीच्या वेळेत उठून सेवेला गेले. रात्री मी त्यांना त्यांच्या प्रकृतीविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘सकाळी उठल्यापासून माझे अंग पुष्कळ दुखत होते; पण मी माझी सेवा नेहमीप्रमाणे चालू ठेवली. तेव्हा सायंकाळी अंगदुखी पूर्णपणे थांबली. ‘अशा परिस्थितीशी लढण्यासाठी मला बळ दे’, असे मी देवाला सतत सांगतो आणि देवाचे साहाय्य मिळाल्यामुळे मला परिस्थितीवर मात करता येते.’’
७ इ. वैयक्तिक कामांपेक्षा साधकांना सेवेत साहाय्य करण्यास प्राधान्य देणे : सेवा संपवून खोलीत झोपायला आल्यावर किंवा सकाळी वैयक्तिक कामे करत असतांना त्यांना अनेक साधकांचे भ्रमणभाष येतात. तेव्हा ते वैयक्तिक कामे बाजूला ठेवून तत्परतेने त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतात आणि साधकांना साहाय्य करतात. अशा वेळी ते भ्रमणभाष घेणे कधीच टाळत नाहीत.
७ ई. सेवेविषयी विकल्प नसणे : श्री. भानु विविध सेवा तत्परतेने करतात. याविषयी एकदा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला एवढ्या सेवा करायला कशा जमतात ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘सनातन संस्थेत आल्यावर मला ज्या ज्या सेवा मिळाल्या, त्या मी कोणताच विकल्प न आणता करत गेलो. मला कोणत्याही विषयाची माहिती आहे किंवा ज्ञान आहे, असे नाही, तरीही देवाने मला सेवा दिली आहे, तर मी देवावर श्रद्धा ठेवून करतो आणि ती सेवा आपोआप पूर्ण होते.’’
७ उ. भानु प्रत्येक सेवा उत्साहाने आणि मन लावून करतात अन् सेवेतील सहसाधकांना समजून घेतात. त्यामुळे त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
‘श्री. भानु मला यजमान म्हणून लाभणे, ही भगवंताची कृपा आहे. त्यांच्याकडून मला अनेक सूत्रे शिकायला मिळतात; पण ती सूत्रे कृतीत आणण्यास मीच पुष्कळ अल्प पडते. माझ्याकडून श्री. भानु यांच्याप्रमाणेच समर्पित होऊन गुरुसेवा केली जाऊदे’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. आरती भानु पुराणिक (वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.४.२०२३)
|