निफाड (जिल्हा नाशिक) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा कै. सात्त्विक भगुरे (वय ३ वर्षे) याच्या मृत्यूसमयी त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
१० ते १२.२.२०२३ या कालावधीत आम्ही (मी, पत्नी आणि सात्त्विक, सात्त्विकचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील, मामा आणि मावशी) असे सर्व जण तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी येथे देवदर्शनाला गेलो होतो. १२.२.२०२३ या दिवशी सकाळी १० वाजता सात्त्विक याचे आमचे कुलदैवत श्रीखंडोबाच्या जेजुरी गडावर अकस्मात् निधन झाले. या प्रसंगाच्या वेळी कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/679055.html |
१. जेजुरीगड चढून खंडोबाच्या मंदिरात गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. ‘१२.२.२०२३ या दिवशी सकाळी ६ वाजता आम्ही खंडेरायाच्या जुन्या गडावर जात होतो. त्या वेळी सात्त्विकला थोडा थकवा जाणवत असल्यामुळे आम्ही त्याला उचलून मंदिरापर्यंत नेले.
आ. आम्ही सर्व जण दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. त्या वेळी त्याची आजी त्याला मंदिराच्या आवारात घेऊन बसली होती. त्या वेळी एक पांढरा कुत्रा सात्त्विकच्या अगदी जवळ आला. त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने येऊन सांगितले, ‘‘बाळाला काहीही झालेले नाही. त्याला केवळ दृष्ट लागली आहे.’’
इ. थोड्याच वेळात ज्योतीने (सात्त्विकच्या आईने) कापराने त्याच्यावरील त्रासदायक आवरण काढले. त्या वेळी आमच्याकडे असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र हसरे असल्याचे जाणवले.
ई. हे पाहून माझ्या आईने (त्याच्या आजीने) सात्त्विकला सांगितले, ‘‘प.पू. डॉक्टर तुझ्याकडे बघून हसत आहेत बघ.’’ त्या वेळी सात्त्विकने ते छायाचित्र बघितले. थोड्या वेळाने तो म्हणाला ‘‘आई, मला घरी जाऊन झोपायचे आहे.’’
२. आम्ही थोडा वेळ रांगेत उभे असतांना सात्त्विकने माझ्याकडे (वडिलांकडे) पाहिले आणि मोठ्याने हाक मारून मला घट्ट मिठी मारली.
३. आम्ही त्याला घेऊन मंदिरात गेलो. मंदिरात त्याच्या आजोबांनी त्याच्या अंगावर थोडा भंडारा टाकला.
४. श्रीखंडोबाचे दर्शन घेतांना सात्त्विकचे अंग सैल पडल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांचा जयघोष करत रुग्णालयात जाण्यासाठी गड उतरणे
सात्त्विक माझ्या कडेवर घट्ट मिठी मारून होता. दर्शन घेण्यासाठी त्याचे डोके श्रीखंडोबाच्या चरणांवर टेकवले आणि त्या क्षणी त्याला पुन्हा उचलून घेतांना त्याचे अंग सैल पडल्याचे जाणवले. आम्ही त्याला कसेबसे सावरून मोकळ्या हवेत नेले; पण तो मान धरत नव्हता. त्याचे शरीर शिथिल पडल्याचे जाणवत होते. आम्हाला ‘काय करावे ?’, ते सुचत नव्हते. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी आम्ही गड उतरू लागलो. तेव्हा आम्ही ‘प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण’, यांचा धावा करत होतो आणि मध्येमध्ये जयघोष करत होतो. त्या वेळी प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण त्याच्या समवेत असल्याचे जाणवत होते. अर्धा गड उतरून बानूबाईच्या मंदिराजवळ आल्यावर आम्ही दोघांनी मोठ्या आवाजात जयघोष केला. त्या वेळी त्याचे शरीर पूर्ण शिथिल झाले असल्याचे लक्षात आले. गडावरील एका व्यक्तीने आम्हाला त्याला रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य केले.
५. सात्त्विकला चिकित्सालयात नेल्यावर वैद्यांनी त्याचे निधन झाल्याचे सांगणे
आम्ही सात्त्विकला घेऊन गडाच्या पायथ्याशी असलेल्या चिकित्सालयात पोचलो. तेथे आधुनिक वैद्यांनी सात्त्विकला तपासले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्या क्षणी आम्हाला पुष्कळ दुःख झाले.’
– श्री. संदीप भगुरे (वडील)
६. सात्त्विकच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या आजोबांना घरात भंडारा उधळल्यासारखे दिसणे
‘सात्त्विकच्या मृत्यूच्या दिवशी पहाटे माझ्या घरातील देवघरात ठेवलेल्या करंड्यातील खंडोबाचा भंडारा मांजराने सांडला. तो भंडारा अगदी पूर्ण देवघरात उधळल्यासारखा दिसत होता.’
– श्री. सुनील आवारे, चांदवड (सात्त्विकचे आजोबा)
७. मृत्यूनंतर सात्त्विकच्या हाताच्या मुद्रा असल्याचे दिसणे, त्याचे पार्थिव नाशिक येथे आणणे
सात्त्विकच्या मृत्यूनंतर अंत्यविधीच्या वेळेपर्यंत सात्त्विकच्या दोन्ही हातांच्या मुद्रा झाल्या असल्याचे दिसले. प्रवासात आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावली होती आणि आमचा दत्ताचा नामजप चालू झाला. आम्ही अधूनमधून भावनाशील होत असतांनाही आतून दत्तगुरूंचा नामजप चालू असल्याचे जाणवत होते. या प्रसंगातही जेजुरी ते नाशिक (निफाड) हा ६ घंट्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडला.
८. अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे
८ अ. चेहर्यावर तेज जाणवणे : ‘सात्त्विकचा मृत्यू सकाळी १० वाजता झाला. त्यानंतर जेजुरी ते निफाड हा ६ घंट्यांचा प्रवास होऊनही अंत्यविधीपर्यंत त्याच्या चेहर्यावर तेज जाणवत होते’, असे अनेक नातेवाइकांच्या लक्षात आले.’
– श्री. संदीप भगुरे
८ आ. अंत्ययात्रेत काळा कुत्रा सहभागी होणे : ‘घरून सात्त्विकला अंत्यविधीला घेऊन जात असतांना अंत्ययात्रेत एक काळा कुत्रा सर्वांत पुढे चालत होता. तो शेवटपर्यंत सहभागी झाला होता. अनेकांना याचे आश्चर्य वाटले.’
– श्री. ज्ञानेश्वर भगुरे (काका)
८ इ. ‘त्याच्या अंत्यविधीच्या वेळी श्री दत्तगुरु आले आहेत’, असे मला जाणवले.’
८ ई. ‘सात्त्विक भंडार्याने पिवळ्या झालेल्या नदीत अंघोळ करत आहे’, असे स्वप्नात दिसणे : ५.३.२०२३ या दिवशी रात्री मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात ‘तो श्रीखंडोबाच्या भंडार्याने पिवळ्या झालेल्या नदीत अंघोळ करत आहे आणि तो अतिशय आनंदी आहे’, असे मला दिसले.
– सौ. ज्योती भगुरे (आई)
९. सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी कुटुंबियांना आधार देणे
सात्त्विक हा आमच्या कुटुंबातील आनंद होता. त्याच्या अकस्मात् जाण्याने आम्हा सर्व कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला होता. १३.२.२०२३ या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका आमच्या घरी आले. या दुःखद प्रसंगाच्या वेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून आध्यात्मिक दृष्टीकोन दिला. त्यामुळे आम्हा सर्वांची मनःस्थिती स्थिर होण्यास साहाय्य झाले. या कठीण प्रसंगातही परात्पर गुरु डॉक्टर हे सद्गुरूंच्या रूपाने आम्हा सर्वांच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’
(समाप्त)
– सर्व कुटुंबीय.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |