धर्माधारित हिंदु राष्ट्रासाठी धर्मशिक्षण आणि एकत्रित प्रयत्न आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
उज्जैनमध्ये (मध्यप्रदेश) प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !
उज्जैन – आपल्या संस्कृतीत वर्षभर अनेक सण येतात. या सणांचे शास्त्र, त्यामागील इतिहास समजून घेऊन येणार्या पिढ्यांना सांगणे आवश्यक आहे. ते कळल्यावर प्रत्येक हिंदूला धर्माचा इतका अभिमान वाटेल की, तो धर्म पालटणार नाही, तसेच आपल्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात अडकणार नाहीत. त्यासाठी स्वत: धर्मशिक्षण घेऊन समाजालाही ते द्यावे लागेल. धर्माधारित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मशिक्षण आणि एकत्रित प्रयत्न आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
येथील आनंद भवनमध्ये आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी, तर ‘दबंग हिंदू सेने’चे सहसंस्थापक श्री. ललित परमार यांनी हिंदु जागृतीसाठी चालू असलेल्या ‘हिंदू जोडो’ यात्रेची माहिती सांगितली.
अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
दबंग हिंदू सेनेचे संस्थापक श्री. लोकेश शर्मा, भारत रक्षा मंचचे मध्य भारत संघटनमंत्री श्री. शैलेंद्र सेठ, भारत रक्षा मंचचे युवा शाखेचे अध्यक्ष श्री. कपिलसिंह गौड, श्री. विजय जोशी, सौ. किरण कुलकर्णी, स्वर्णिम भारत मंचचे संस्थापक श्री. दिनेश श्रीवास्तव, गायत्री परिवारचे श्री. श्यामकुमार, श्री. सतीश शर्मा उपस्थित होते. सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अन्य मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन –
१. राजश्री जोशी, अध्यक्षा, महिला शाखा, रा.स्व. संघ : राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी एकत्रित अन् नियमित प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला निश्चित दिशादर्शनाच्या माध्यमातून हे शक्य होऊ शकते.
२. श्री. प्रमोद शर्मा, राष्ट्रीय निवडणूक प्रभारी (तात्पुरता पदभार), अखिल भारतीय हिंदु महासभा : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पाठिंबा देणारे किंवा हिंदूंच्या हितासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी ही काळाची आवश्यकता आहे.
३. श्री. आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती : जी व्यवस्था आज भारत आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात काम करत आहे, ती प्रशिक्षित आहे. त्यांच्यात समन्वय आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत अडथळा ठरणार्या या व्यवस्थेला निपटण्यासाठी आपण सुनियोजित प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी आपल्या संघटनेचा कार्यकर्ता हा ‘हिंदु धर्मप्रचारक’ बनणे आवश्यक आहे.
क्षणचित्र
या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी हिंदु राष्ट्राशी संबंधित अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
आभार
कार्यक्रमाला सभागृह उपलब्ध करून दिल्याविषयी भाजपचे शहराध्यक्ष श्री. विवेक जोशी आणि नगरसेवक आभा कुशवाह यांचे आभार व्यक्त करण्यात आले.