गोवा : बेतोडा येथे चारचाकी, तर कुंडई येथे कंटेनर उलटून भीषण अपघात
गोव्यात अपघातांचे सत्र चालूच
फोंडा, १ मे (वार्ता.) – गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र चालूच आहे. ३० एप्रिलला वास्को येथील अपघातात ३ युवक ट्रीपल सीट (एका दुचाकीवर तिघांनी बसून जाणे) जात असतांना पोलिसांना चुकवण्याच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ठार झाले, तर मानसवाडा, कुंडई येथील धोकादायक वळणावर ३० एप्रिलला कंटेनर उलटून २ चारचाकी (कार) वाहनांसह ५ दुचाकींची हानी झाली. १ मे या दिवशी अपघातांचे सत्र चालू रहातांना फोंडा तालुक्यातील बेतोडा-बोरी बगलमार्गावर एक चारचाकी (कार) रस्त्यावर उलटली. या अपघातात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनचालकाचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर घायाळ झाले आहेत. घायाळांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले असून वाहनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
३० एप्रिलच्या रात्री १० वाजता कुंडई येथील उतरतीवरील भीषण अपघातात कंटेनरने एका दुकानाला धडक दिली आणि कंटेनर उलटला. या वेळी बाजूला असलेल्या २ चारचाकी आणि ५ दुचाकी यांचा अक्षरश: चुराडा केला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. कुंडई येथे याच ठिकाणी वर्षभरात १०० अपघात घडतात; पण ते रोखण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. ३० एप्रिलला अपघातानंतर येथील सरपंच आणि पंचसदस्य यांच्यासह अपघातस्थळी जमलेल्या संतप्त ग्रामस्थांनी रस्ता बंद करत अपघातग्रस्त वाहने पंचनाम्यानंतर हालवण्यास विरोध केला.
3 killed in two road accidents in South Goa https://t.co/xrj6XPtC3X
— TOI Cities (@TOICitiesNews) May 1, 2023
हडफडे येथील अपघातात कर्नाटकातील व्यक्तीचे निधन
१ मे या दिवशी हडफडे येथे झालेल्या एका अपघातात कर्नाटकमधील दुचाकीस्वार रियाझ पिंजर याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याजवळील वाहतूक बूथला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला.