परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याचे प्रक्षेपण पहातांना उत्तरप्रदेश येथील साधकांना आलेल्या अनुभूती
१३.५.२०२० आणि १५.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाचा सोहळा साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे दाखवण्यात आला. त्या वेळी उत्तरप्रदेश येथील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. कु. सुमन सिंह (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), वाराणसी
१ अ. भावसोहळ्याच्या आदल्या दिवशीपासून सूक्ष्म नाद ऐकू येणे : ‘भावसोहळ्याच्या आदल्या दिवशी मी पुष्कळ आनंद अनुभवत होते. ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, असे मला वाटत होते. तेव्हा मला शंखनाद, घंटानाद, रामनाथी आश्रमात होत असलेली आरती आणि जयघोष यांचे स्वर ऐकू येत होते.
१ आ. मन उत्साही आणि आनंदी होणे : काही दिवसांपासून माझी शारीरिक स्थिती ठीक नसल्यामुळे माझे मन निरुत्साही होते. मनाला काहीच चांगले वाटत नव्हते; परंतु भावसोहळ्याच्या आदल्या दिवशी सायंकाळपासून मला पुष्कळ उत्साह आणि आनंद जाणवू लागला अन् प्रत्येक क्षणी परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण आपोआप होऊ लागले.
१ इ. शारीरिक त्रास होतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर चैतन्य आणि शक्ती अनुभवणे : कार्यक्रमाचे प्रक्षेपण पहाण्यापूर्वी मला पुष्कळ चक्कर येत होती आणि डोके दुखत होते. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली आणि त्याच क्षणी माझ्यामध्ये पहाता पहाता चैतन्याचा संचार झाला आणि मी शक्ती अनुभवू लागले. त्यानंतर मला डोकेदुखीचा त्रास झाला नाही आणि मी संपूर्ण कार्यक्रम चांगल्या प्रकारे पाहू शकले.
१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हृदयमंदिरात स्थापन करणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुका पूजनाच्या वेळी ‘मी प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुकांची पूजा केली आहे. त्यामुळे माझ्या हृदयमंदिरात त्यांचे रूप स्थापित झाले आहे’, असे मला वाटत होते. त्यानंतर ‘मला आता मूर्तीपूजा न करता प्रत्येक क्षणी माझ्या अंतरातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुकांची पूजा करायची आहे’, असे वाटू लागले.
त्यानंतर मी पुनःपुन्हा माझ्या अंतर्मनाला ‘नामजप चालू आहे ना ? परात्पर गुरुदेवांचे स्मरण करत आहे ना ? ’, असे विचारत होते.
१ उ. सोहळ्यापूर्वी होणारे शारीरिक त्रास पू. नीलेश सिंगबाळ यांनी विभूती दिल्यावर दूर होणे : १५.५.२०२० या दिवशी भावसोहळ्याला आरंभ होण्यापूर्वी मला चक्कर येत होती. या त्रासाविषयी मी पू. नीलेश सिंगबाळ यांना (आताचे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांना) सांगितल्यावर त्यांनी मला विभूती दिली आणि प्रार्थना करायला सांगितली. त्यामुळे माझे शारीरिक त्रास त्वरित न्यून झाले.
१ ऊ. निसर्गातील पंचतत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शक्ती देत असल्याचे आणि तेच जिवाला प्रत्येक कार्य करण्याची ऊर्जा देत असल्याचे जाणवणे : कार्यक्रमामध्ये संतांचे मार्गदर्शन चालू असतांना ‘मी कुणीच नाही’, असे मला वाटून ‘परात्पर गुरु डॉक्टरच मला हा भाव अनुभवायला देत आहेत’, असे मला वाटत होते. तेव्हापासून मी निसर्गाला पाहिल्यावर मला त्याच भावसोहळ्याचे स्मरण होते. त्याचे स्मरण करताच ‘पंचतत्त्वे मला परात्पर गुरु डॉक्टरांची शक्ती आणि ऊर्जा देत आहेत. मी कुणीच नाही. मला बनवणारेसुद्धा तेच आहेत आणि माझ्यामध्ये वाणी, शक्ती, कार्य करण्याची क्षमता अन् पहाण्यासाठी दृष्टी तेच मला देत आहेत. तेच माझ्या आत्म्याला मुक्ती देत आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
२. कु. जया सिंह (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), प्रयागराज
२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचे चैतन्य प्रत्येक क्षणी कार्यरत असल्याचे अनुभवणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र चकती चालू असतांना ‘मीही त्या सत्संगात बसले आहे आणि त्यांचे दर्शन घेत आहे’, असे मी अनुभवले. सत्संगाची पूर्वसिद्धता करतांना मला पुष्कळच आनंद मिळत होता. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे चैतन्य प्रत्येक क्षणी कार्यरत आहे’, असे मी अनुभवत होते.’
३. कु. शोभना मालवीय, वाराणसी
अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणपादुकांच्या प्रतिष्ठापनेचे प्रक्षेपण पहात असतांना माझ्या मनात पुष्कळ भाव दाटून आला आणि मला चैतन्य जाणवत होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रकाश माझ्या नेत्रांतून संपूर्ण शरिरात पसरत आहे’, असे मला जाणवले.
आ. श्री भवानीमातेच्या मूर्तीच्या स्थापनेचे ध्वनीचित्र दाखवतांना ‘पृथ्वीतलावर साक्षात् देवीच आली असून तिचे नेत्र सजीव आहेत आणि ती तिच्या नेत्रांनी बोलत आहे’, असे मला जाणवले.
इ. कार्यक्रमाच्या अखेरीस माझी भावजागृती झाली.
‘बुद्धीच्या पलीकडे असलेल्या विष्णुरूपात परात्पर गुरु डॉक्टरांना प्राप्त करून मी धन्य झाले आणि माझे जीवन सफल झाले’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
४. श्रीमती किरण विश्वकर्मा, सैदपूर
अ. ‘१३.५.२०२० या दिवशी सर्वत्र प्रकाशच प्रकाश पसरला होता.
आ. १५.५.२०२० या दिवशी उत्साह अल्प होता. त्रासाचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर सर्वत्र नारायणच नारायण दिसत होते.’
५. श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), वाराणसी सेवाकेंद्र
५ अ. दिवाळी असल्यासारखे जाणवून ‘वसुंधरा आणि निसर्ग दिवाळीचा आनंद लुटत आहेत’, असे जाणवणे : ‘जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशीपासून ‘उद्या दिवाळीच आहे’, असे मला जाणवत होते. मी नेहमीप्रमाणे तुळशी आणि मोगरा यांच्या रोपांना अन् औदुंबराला पाणी घालत असतांना सहज त्यांच्याकडे दृष्टी पडल्यावर ती रोपे अन् औदुंबराचे झाड नेहमीपेक्षा अधिक टवटवीत दिसले. औदुंबराला पाणी घालत असतांना ‘जणू पाने आनंदाने डोलत आहेत. वसुंधरा आणि निसर्ग आश्रमातील दिवाळीचा आनंद लुटत आहेत. मी उंच उंच भरारी मारत असून त्या आनंदात सहभागी झाल्यामुळे मलाही आनंद मिळत आहे’, असे मला जाणवले.
५ आ. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साक्षात् अन्नपूर्णामाताच आहेत आणि त्या माझ्या घरी स्वतःच सूक्ष्मातून महाप्रसाद बनवत आहेत’, असे जाणवणे : घरी सकाळचा महाप्रसाद बनवत असतांना ‘मला कुणीतरी हाक मारत आहे’, असा मला भास झाला. तो आवाज मंजुळ होता. मी श्री अन्नपूर्णामाता आणि अग्निनारायण यांना प्रार्थना केली. मनोमनी कृतज्ञता व्यक्त करतांना मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सूक्ष्मातून दिसल्या. ‘त्या साक्षात् अन्नपूर्णामाताच आहेत आणि त्या स्वतःच महाप्रसाद बनवत आहेत’, असे वाटून माझा भाव दाटून आला.
५ इ. प्रत्यक्षात वातावरण उष्ण असूनही शीतलता जाणवणे : बाहेर वारा नाही, पंखा नाही, कडक उन्हाळा आहे आणि मी अग्निसमोर उभी आहे, अशी स्थिती असूनही अकस्मात् मला वातावरणात शीतलता जाणवली. ‘त्या क्षणी माझा देह थंड थंड होत आहे’, असे मला जाणवले. परात्पर गुरुदेवांचे स्मरण होऊन ‘गुरु आपल्या भक्तांची काळजी किती आणि कशी घेेतात? आणि न मागता सर्व देतात’, याची मला अनुभूती आली.
५ ई. पाद्यपूजा सांगतांना ‘देहाची तुळस बनून सर्व पाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी समर्पित झाली आहेत’, असे जाणवणे : भावार्चना करत पाद्यपूजा सांगत असतांना ‘ती पूजा मी माझ्या हृदयात करत आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या देहाची तुळस बनून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण होत होती. संपूर्ण तुळशी वृंदावनाला केवळ दोनच छोटी पाने होती. ती तुळस म्हणजे मीच आहे. माझी सर्व पाने गुरुचरणी समर्पित झाली असून मी त्या परमानंदाला अनुभवत होते. त्या वेळी मला ‘त्यातच रममाण व्हावे’, असे वाटत होते.
५ उ. अखंड नामजप आणि अधूनमधून प्रार्थना करत असतांना परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राभोवती चैतन्याच्या गोळ्यात प्रकाशमान असणारे तेजस्वी वलय जाणवले.
५ ऊ. भावसोहळ्याच्या दोन दिवस पूर्वीपासूनच कुलदेवतेचे दर्शन होत असणे : कार्यक्रमामध्ये श्री भवानीमातेचे दर्शन झाले. देवीचा सोहळा पहातांना माझ्या अंगावर रोमांच उभे रहात होते. तेव्हा माझा कंठ दाटून आला होता. मला भावसोहळ्याच्या दोन दिवस आधीपासून माझ्या माहेरी असलेल्या श्री भवानीदेवीचे अधूनमधून दर्शन होत होते. ती माझी कुलस्वामिनी आहे. तीच शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांना शक्ती देत आहे. त्याचप्रमाणे आता परात्पर गुरुदेवांच्या मावळ्यांना (साधकांना) ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज देण्यासाठी तिने रामनाथीला धाव घेतली आहे.
५ ए. रामनाथी आश्रमात होणारे देवीचे पूजन हे हृदयात होत असल्याचे जाणवणे : देवीचे पूजन रामनाथी आश्रमात होत असतांना तेच माझ्या हृदयात मला जाणवत होते. माझा संपूर्ण देह हलका होऊन ‘मला स्वतःचे अस्तित्व नाही. देवी मला व्यापून उरली आहे’, असे मला क्षणभर जाणवले. मला भावाश्रू आवरता येत नव्हते. ही अनुभूती लिहितांनाही ‘मातेचेच दर्शन होत आहे. ती माझ्या जवळच आहे. तीच सर्व लिहून घेत आहे’, असे मला जाणवले.
५ ऐ. ‘पधारो नाथ पूजाको…’ हे भावगीत चालू झाल्यावर माझ्या हृदयमंदिरात परात्पर गुरुदेवांची पूजा होत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा चंदनाचा सुगंध येत होता आणि माझे शरीर हलके झाले.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |