निफाड, जिल्हा नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कै. सात्त्विक संदीप भगुरे (वय ३ वर्षे) !
या लेखात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. सात्त्विक संदीप भगुरे याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये दिली आहेत. १०.२.२०२३ या दिवशी तो त्याच्या कुटुंबियांबरोबर तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी येथे देवदर्शनाला गेलेला असतांना १२.२.२०२३ या दिवशी सकाळी १० वाजता सात्त्विक याचे त्यांचे कुलदैवत श्रीखंडोबाच्या जेजुरी गडावर अकस्मात् निधन झाले. त्याच्या निधनानंतरची सूत्रे दुसर्या भागात देत आहोत.
(भाग १)
१. जन्मापूर्वी
‘गर्भधारणा झाल्यावर मला ‘पुष्कळ नामजप करावा’, असे वाटत होतेे. या कालावधीत मला धार्मिक ग्रंथ वाचण्याची पुष्कळ ओढ लागली होती. या वेळी मी विविध धर्मग्रंथ, ‘नाथ माझा भक्तराज’ आणि ‘शिवचरित्र’ या ग्रंथांचेे वाचन केले. मी सायंकाळी नियमित हरिपाठ ऐकत असे. ‘गर्भधारणेनंतर माझी खर्या अर्थाने साधना चालू झाली’, असे मला वाटते.
१ अ. मी प्रसूतीसाठी माहेरी गेले. तेव्हा प्रतिदिन सायंकाळी आमच्या घराजवळ मोर येत असत. त्या वेळी पोटातील बाळाची हालचाल वाढत असे.’
– सौ. ज्योती भगुरे (आई)
२. जन्मानंतर
‘सात्त्विकच्या जन्मानंतर आम्ही त्याला पहाण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला त्याच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी ‘ॐ’ असल्याचे जाणवले.’
– सौ. सविता भगुरे (सात्त्विकची काकू)
३. वय – १ ते २ वर्षे
३ अ. देवाची आणि सात्त्विकतेची आवड
१. ‘सात्त्विकला मंदिरात नेल्यावर तो शांत रहात असे. त्याला विठ्ठलाचे भक्तीगीत ऐकवले की, तो लवकर झोपत असे. तो रडत असतांना आम्ही नामजप केला की, लगेच शांत व्हायचा.
२. त्याच्या कपाळावर गंध लावले की, त्याला आनंद होत असे.
३. आम्ही कापूर आणि अत्तर यांच्या सुगंधाने तो स्थिर होत असे.
४. वय – २ ते ३ वर्षे
४ अ. सुगंध येणे : त्याला सायंकाळी फिरायला घेऊन गेल्यावर ‘मला छान सुगंध येतो’, असे तो सांगत असे. सभोवताली उदबत्ती लावलेली नसतांना किंवा कुठल्याही फुलाचे झाडही नसतांना त्याला अशी अनुभूती यायची.’
– सौ. ज्योती भगुरे (आई)
४ आ. स्वावलंबी : ‘तो स्वतःची कामे स्वतः करत असे, उदा. दात घासणे, अंघोळ करणे, जेवणे, वस्तू आवरून ठेवणे आणि अंघोळीचे कपडे घेऊन येणे इत्यादी.’
– श्री. संदीप भगुरे (वडील)
४ इ. प्रेमळ
१. ‘सात्त्विक अतिशय प्रेमळ होता आणि तो सर्वांची प्रेमाने विचारपूस करत असे.’
– सौ. सविता भगुरे (सात्त्विकची काकू)
२. ‘इतक्या लहान वयातही विविध प्रसंगांत तो सर्वांचे मन सांभाळण्याचा प्रयत्न करत असे. हे बघून मला त्याचे पुष्कळ कौतुक वाटत असे.
३. घरात कुणी रुग्णाईत असेल, तर तो त्यांची विचारपूस करत असे.
४. घरात साधक आले, तर त्याला आनंद होऊन त्याचा चेहरा उजळायचा.’
– श्री. ज्ञानेश्वर भगुरे (सात्त्विकचे काका)
४ ई. मारक्या गाईला न घाबरता गवत खाऊ घालणे आणि गाय सात्त्विकच्या येण्याची वाट पहात असणे : ‘रात्री जेवणानंतर मी सात्त्विकला घेऊन फिरायला जात असे. तेथे एका घरासमोर काळ्या रंगाची गाय बांधलेली असायची. सात्त्विक त्या गायीच्या अगदी जवळ जाऊन तिला गवत खाऊ घालत असे. गाय सात्त्विकच्या येण्याची वाट पहात असे. असे ६ – ७ मास चालले होते. सात्त्विकचे निधन झाल्यावर त्या गायीचे मालक आमच्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘आमची गाय मारकी आहे. ती आमच्या कुटुंबियांनाही जवळ येऊ देत नाही. तिला सांभाळणार्या कामगारालाही तिने २ वेळा मारले आहे.’’ हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले.
४ उ. देवाची आवड
१. सात्त्विक अंघोळ झाल्यावर आठवणीने जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा आणि मलाही कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून देत असे.
२. मी सकाळी देवपूजा करतांना तो माझ्या समवेत बसायचा. तो देवघरातील प्रत्येक मूर्तीविषयी मला प्रश्न विचारून माहिती करून घेत असे.’
– श्री. संदीप भगुरे (सात्त्विकचे वडील)
४ ऊ. साधनेची आवड
१. ‘सात्त्विक नामजप करत असे. तो नियमित प्रार्थना करायचा आणि कृतज्ञताही व्यक्त करत असे.
२. तो सद़्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी सांगितल्याप्रमाणे शरिरावरील काळ्या शक्तीचे त्रासदायक आवरण काढत असे.
३. मी आणि ज्योती (जाऊ) सेवेला जातांना तो कधीच आमच्या मागे लागला नाही. आम्ही सेवेला निघतांना तो आम्हाला म्हणायचा, ‘‘छान सेवा करून या. सगळे साहित्य आणि सात्त्विक उत्पादने घेऊन जा.’’
(क्रमश:)
– सौ. सविता भगुरे (सात्त्विकची काकू)