नाशिक येथील रामकुंडातील तळाचे काँक्रीट काढण्याला पुरोहित संघाचा विरोध !
नाशिक – ‘गोदावरी नदीतील सिमेंट काँक्रीटीकरण काढून टाकण्यात यावे’, असा अहवाल नाशिक स्मार्ट सिटीने गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिल्यानंतर पुरोहित संघ आणि जीवरक्षक दल यांनी याला हरकत घेत काँक्रीटीकरण न काढण्याची भूमिका घेतली. यानंतर स्मार्ट सिटीने दोन्ही बाजूंची बैठक घेतल्यानंतरही तोडगा निघालेला नाही; मात्र त्रिसदस्य समितीने दिलेल्या निर्णयानुसार नदीपात्रातील रामकुंड काँक्रीटीकरण काढण्याचे काम पुन्हा चालू करण्यात येणार आहे, असा निर्वाळा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी ३० एप्रिल या दिवशी दिला आहे.
दुसरीकडे ‘रामकुंडातील तळाचे सिमेंट काँक्रीटीकरण काढू नये, यासाठी पुरोहित संघ, व्यापारी, जीवरक्षक दल आणि परिसरातील नागरिक यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. सांडव्यावरचे काँक्रीट काढल्याने काही जण वाहून गेले. काँक्रीट काढण्याचा प्रयत्न केला, तर वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करणार आहे’, अशी भूमिका पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी घेतली आहे.
( सौजन्य : DIGVIJAY PATIL )
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गोदावरी नदीचे सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे. गोदावरी नदी पात्रातील अनेक ठिकाणचे तळ काँक्रीट काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जल स्रोतांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर दुसरीकडे रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्यात यावे यासाठी देवांग जानी यांनी याचिका प्रविष्ट केली होती. स्मार्ट सिटीने तरी सदस्यीय समिती गठीत करत अहवाल सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या समितीने रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्यात यावा, असा अहवाल दिला. याला विरोध झाल्याने या संदर्भात २ दिवसांपासून बैठका घेऊनही वाद मिटत नसल्याचे चित्र आहे.
नदीपात्रातील पाण्याचे आवर्तन पाहून, तसेच रामकुंडावर काही धार्मिक कार्यक्रम आहे कि नाही याची माहिती घेत सदर कामाचे नियोजन केले जाणार आहे. आवश्यकता पडल्यास पोलीस बंदोबस्तात सदर कुंडातील काँक्रीटीकरण काढण्याचे काम हाती घेणार आहे, असे स्मार्ट सिटीचे मोरे यांनी सांगितले.