कालानुरूप जनकल्याणासाठी समष्टी साधनेचे महत्त्व !
१. यज्ञातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर देवतांनी जनकल्याणासाठी केल्यामुळे यज्ञ करणार्यांना पुण्यबळ प्राप्त होणे
‘पूर्वी ऋषिमुनी, राजे आणि गृहस्थ नियमित यज्ञयाग करायचे. यज्ञयागांच्या माध्यमांतून देवतांना हविष्य, म्हणजे आहुती मिळत असे. त्यातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर देवता जनकल्याणासाठी करत असत. अशा प्रकारे यज्ञयागांचे फळ जनकल्याणासाठी वापरले जायचे आणि देवतांचे निर्गुण स्तरावरील तत्त्व वाईट शक्तींच्या निर्दालनासाठी, म्हणजे वातावरणातील रज-तमाचा नाश करून समाजव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी वापरले जायचे. या माध्यमातून समष्टीचे कल्याण झाल्यामुळे यज्ञ करणार्यांना पुण्यबळ प्राप्त होत असेे.
२. आता समष्टी साधनेचे बळ नसल्यामुळे वातावरणातील रज-तम आणि वाईट शक्ती यांच्यावरील नियंत्रण न्यून होणे
आता पूर्वीप्रमाणे व्यवस्था नाही. साधना करणार्यांना राजाश्रय मिळत नाही. बहुतांश लोक स्वार्थी झालेले आहेत. त्यामुळे त्यांची समष्टी साधना होत नाही. समष्टी साधनेचे बळ नसल्यामुळे त्यातून निर्माण होणार्या ऊर्जेच्या अभावामुळे सृष्टी नीट चालवण्यासाठी देवतांना निर्गुण स्तर त्यागून त्या शक्तीचा वापर काही प्रमाणात सगुण, म्हणजेच स्थुलातून करावा लागतो. त्यामुळे निर्गुण स्तरावर कार्यरत ईश्वरी तत्त्व तुलनात्मकदृष्ट्या संख्यात्मक स्तरावर अल्प होते. परिणामी वातावरणातील रज, तम आणि वाईट शक्ती यांच्यावरील नियंत्रण न्यून होऊन सध्याच्या काळात जी स्थिती निर्माण झाली आहे, ती होते.
३. अधिकाधिक लोकांनी समष्टी साधना केल्यास सर्व जिवांसाठी कल्याणकारी परिस्थिती निर्माण होऊ शकणे
वातावरणातील रज, तम आणि वाईट शक्तींचा प्रभाव टाळण्यासाठी कालानुरूप यज्ञयाग शक्य नसले, तरी समष्टी साधना म्हणजे ‘समाजातील अधिकाधिक लोकांनी योग्य मार्गाने निष्काम साधना करणे’, आवश्यक आहे. असे झाल्यास देवतांच्या निर्गुण शक्तीचा वापर पुन्हा रज-तमाच्या नाशासाठी होऊन सर्व जिवांसाठी कल्याणकारी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
४. योग्य नामजप केल्याने त्यातून निर्माण होणारी ऊर्जा देवतांना प्राप्त होऊन त्याद्वारे जनकल्याणच साध्य होत असणे
पूर्वीप्रमाणे यज्ञयाग करणे सर्वांना शक्य नसले, तरीही भगवंताने श्रीमद़्भगवद़्गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि’, म्हणजे ‘सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ, म्हणजे नामजप करणे सर्वश्रेष्ठ आहे’, हे लक्षात ठेवून प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे आणि निष्काम भावनेने अधिकाधिक नामजप केला, तरीही ही ऊर्जा देवतांना प्राप्त होऊन त्याद्वारे वरील प्रक्रियेप्रमाणे जनकल्याणच साध्य होईल. ‘योग्य नामजप करणे’, हे सहज, सुलभ आणि विनासायास करण्याजोगे असल्यामुळे सामान्यातील सामान्य व्यक्तीसुद्धा नामजप अधिकाधिक क्षमतेने करू शकते.’
– श्री. नीलेश चितळे (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), फोंडा, गोवा. (१७ १.२०२३, रात्री ९.३०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |